घरमहाराष्ट्रSharad Pawar Resigns: राष्ट्रवादीमध्ये दोन गट? जयंत पाटलांनी स्पष्ट केली भूमिका

Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादीमध्ये दोन गट? जयंत पाटलांनी स्पष्ट केली भूमिका

Subscribe

 

पुणेः अध्यक्ष पदावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आमच्यात दोन गट पाडू नका. आमच्यात दोन गट नाहीत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. सकाळी पुण्यात असलेले जयंत पाटील हे संध्याकाळी शरद पवार यांच्या सिलव्हर ओक बंगल्यावर दाखल झाले.

- Advertisement -

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडल्याची घोषणा मंगळवारी केली. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांनी आक्षेप घेतला. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले. काही कार्यकर्ते तर थेट आंदोलनालाच बसले. पवार साहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, असे भावनिक आवाहन कार्यकर्त्यांनी केले. तर अजित पवार यांनी या राजीनाम्याचे समर्थन केले. पवार साहेब अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहेत. त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही. तेव्हा त्यांचा निर्णय आपण मान्य करायला हवा, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत राजीनाम्याबाबत फेरविचार करण्यासाठी शरद पवार यांनी दोन दिवसांची मुदत घेतली. त्याचवेळी नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी शरद पवार यांनी समिती स्थापन केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण असेल यावरुन चर्चा सुरु झाली. अजित पवार की सुप्रिया सुळे, असे तर्कविर्तक सुरु झाले. नवीन अध्यक्षावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरु झाली.

- Advertisement -

त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, आमच्यात दोन गट नाहीत. तुम्ही आमच्यात गट पाडण्याचा प्रयत्न करु नका. मी मुंबईत नाही. पण अनेक आमदार, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष यांची भावना एकच आहे की, शरद पवार साहेबांनी राजीनामा देणं योग्य नाही.

जयंत पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिले असले तरी शरद पवार यांनी ५ मेरोजीच समितीची बैठक घ्या, असे सांगितले आहे. त्यामुळे समिती नवीन अध्यक्ष म्हणून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा अजित दादांकडे जाते की सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते यावरुन चागंलीच चर्चा रंगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -