कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मन सध्या कशातच लागत नाही, असा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. ही गोष्टी स्वत: जयंत पाटील यांनीच नागपूरला मुक्कामी असताना सांगितली आहे, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. मुश्रीफांच्या विधानामुळे जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार का? ते भाजपत जाणार की अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
जयंत पाटील विधानसभा निवडणुकीनंतर नक्की नाराज आहेत, असं मुश्रीफ यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते
हसन मुश्रीफ यांनी म्हटले, “मला नागपूरला जयंत पाटील यांनी बोलून दाखवले होते की, ‘मुश्रीफ साहेब माझे मन कशातच लागत नाहीत.’ सत्तेत नसताना पाच वर्षे पक्ष टिकवणे आणि हे सर्व टिकून राहणे फार अवघड आहे, याची कल्पना जयंत पाटील यांना आली असावी. त्यांचे मन परिवर्तन होणार का हे आता जयंत पाटील यांनाच विचारावे लागेल.”
शक्तिपीठ महामार्गावर सुद्धा मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे. “शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून मी शेतकऱ्यांसोबत आहेत. पण, शेतकरीच बदलणार असतील, तर माझा नाईलाज आहे. अचानकपणे काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ठरवायचे की काय करायचं आहे,” असे मुश्रीफ यांनी म्हटले.
धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या पदावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्याकडील खाते अजितदादांकडेच आहे. धनंजय मुंडे निर्दोष झाले, तर त्यांना ते खाते द्यावे लागणार आहे.”
हेही वाचा : तरूणाला बेल्ट, काठी अन् पाईपने बेदम मारहाण; धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण