बुलढाणा : या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांच्यात चुरशीची लढत झाली. आज समोर आलेल्या निकालातही शेवटच्या क्षणापर्यंत कोण विजयी होणार हे सांगणे कठीण होऊन बसले होते. मात्र आता जयश्री शेळके यांचा पराभव झाल्याचे समोर येत आहे. (Jayashree Shelke defeated in a close contest in Buldhana constituency in the assembly elections)
आज सकाळी सुरुवातीला पोस्टल मतांनी मोजणी करण्यात आली. यावेळी जयश्री शेळके यांनी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या मतमोजणीवेळी आमदार संजय गायकवाड यांनी पाहिल्या फेरीत आघाडी घेतली. यानंतर झालेल्या 25 फेऱ्यांमध्ये अनेक चढउतार पाहायला मिळाले. कधी गायकवाड अल्प आघाडी पुढे होते, तर कधी शेळके पुढे होत्या. त्यामुळे 24 व्या फेरीपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नव्हते. शेवटच्या आणि अंतिम फेरीत संजय गायकवाड यांनी बाजी मारली. यासह ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यांना 90 457 मतं मिळाली, तर जयश्री शेळके यांना 88 हजार 984 मतं मिळाली. दोघांच्याही मताधिक्क्यावर नजर टाकली तर फक्त 1473 मतांचा फरक आहे.
हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : नाम साधर्म्य असल्याने मविआला फटका; शेळकेंचा 1500 मतांनी पराभव
जयश्रीं शेळकेंच्या पराभवाचे नेमके कारण काय?
दरम्यान, बुलढाणा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत वाघोदे आणि जयश्री रवींद्र शेळके असे साधर्म्य असलेली आणखी एक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. प्रशांत वाघोदे यांनी 7084 मते घेतली तर साधर्म्य असलेल्या महिलेने 638 मते घेतली. या दोन्ही उमेदवारांनी जयश्री सुनील शेळके यांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय अन्य उमेदवारांमुळेही झालेल्या मत विभाजनाचा जयश्री सुनील शेळके यांना फटका बसला. विशेष म्हणजे या चुरशीच्या लढतीत तब्बल 1660 मते ‘नोटा’ ला मिळाली.