घरमहाराष्ट्रसासूला कोंडून सुनेने चोरले दागिने

सासूला कोंडून सुनेने चोरले दागिने

Subscribe

सांगली येथे सासूला कोंडून सूनेने पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल साडेचार लाखांचा ऐवज घेऊन पळून जाणाऱ्या सूनेला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

सांगलीमध्ये घरातल्याच चोराने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. मात्र ही चोरी करताना सासूलाच कोंडून सुनेने दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. सोनम नीरव नाकरानी (१९) असे आरोपीचे नाव आहे. दागिने चोरुन मध्य प्रदेशात माहेरी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणीला पकडण्यात पोलिसांना यश आले असून तिला संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

सांगलीमधील कुपवाड परिसरात प्रणव अपार्टमेंट येथे नीरव नाकरानी हे आई, भाऊ आणि पत्नी सोनम नाकरानी यांच्या सोबत राहत होते. नीरव नकरानी यांचा चार महिन्यापूर्वी नात्यातच असलेल्या सोनम हिच्यासोबत प्रेम विवाह झाला होता. त्यांची पत्नी मूळची मध्य प्रदेशातील आहे.

- Advertisement -

ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी आई लीलाबेन कांतिलाल नाकरानी आणि पत्नी सोनम नाकरानी या दोघीच घरात होत्या. लीलाबेन दुपारचे जेवण करुन बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेल्या. याच संधीचा फायदा घेत सोनम हिने त्यांच्या बेडरुमला बाहेरुन कडी घातली आणि कपाटावर डल्ला मारला. सोनमने कपाटात असलेल्या लॉकरमधून सोन्या – चांदीचे दागिने, १२ हजाराची रोकड आणि मोबाईल असा एकूण साडेचार लाखांचा ऐवज घेऊन पळून गेली. सोनम ही पुण्यातून माहेरीच जाईल असा संशय होता. त्यानुसार सांगली पोलिसांनी लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली आणि सोनमला पुण्यात पकडण्यात यश आले. तिच्या बॅगेची झडती घेण्यात आली त्यावेळी सर्व ऐवज पोलिसांना सापडला.

चोरी का केली?

सोनम नाकरानी हिला पकडून पोलिसांनी सांगलीतील संजयनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तिची सध्या कसून चौकशी सुरु आहे. पण ती काहीही बोलत नसल्याने चोरीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. तिच्या वडिलांना देखील मध्यप्रदेश येथून बोलवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -