घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअग्नीतांडवाला जिंदाल कंपनीच कारणीभूत; ७ जणांविरुध्द गुन्हा

अग्नीतांडवाला जिंदाल कंपनीच कारणीभूत; ७ जणांविरुध्द गुन्हा

Subscribe

नाशिक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (दि.१ जानेवारी) इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत लागलेल्या भीषण आगीच्या घटनेला जिंदाल कंपनीच कारणीभूत असल्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या दौर्‍यात कंपनीला भेट देत एवढ्या दिवसांनंतरही गुन्हा दाखल न केल्याबाबत विचारणा केली होती. अखेर, चालढकल करणार्‍या इगतपुरी पोलिसांनी कंपनीच्या ७ अधिकारी-कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

कंपनीतील आगीत महिमा कुमारी प्रल्हाद सिंग, अंजली रामकुबेर यादव व सुधीर लालताप्रसाद मिश्रा यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत २२ कामगार जखमी झाले होते. घोटी पोलीस ठाण्यात या घटनेबाबत अकस्मात मृत्यू व अकस्मात जळीत दाखल करण्यात आले होते. या घटनेची चौकशी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर करत होते. त्याअनुषंगाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, नाशिक व संबंधित विभागांना पत्रव्यवहार करुन अहवाल मागविण्यात आले होते. त्याचबरोबर कंपनीचे सेफ्टी ऑडिट रिपोर्ट व इतर कागदपत्रे प्राप्त करण्यात आली होती. सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले.

- Advertisement -

ज्या बॅच पॉलिफिल्म प्लॅन्टमध्ये प्रथमतः आग लागली तो बॅच पॉलिफिल्म प्लॅन्ट सुमारे दीड महिन्यांपासुन बंद होता. तो सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी व दुरुस्ती होवून, तो सुरू करताना एसओपीचे पालन न केल्याने, प्लॅन्टमधून थर्मिक फ्लुईड ऑईलची गळती होवुन मोठा स्फोट झाला व आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत विरोधी पक्षनेते दानवे यांनी सोमवारी (दि. २०) घटनास्थळाची पाहणी केली होती. तसेच आतापर्यंत गुन्हा कसा दाखल करण्यात आला नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

या आगीत १ पुरुष व २ महिला कामगार यांच्या मृत्यूस व कंपनीच्या इतर २२ कामगारांच्या दुखापतीस जिंदाल पॉलीफिल्म कंपनीचे भोगवटादार, फॅक्टरी मॅनेजर, पॉली फिल्म प्लॅन्ट बिजनेस हेड, प्रॉडक्शन मॅनेजर, मेन्टेनन्स विभाग प्रमुख, प्रॉडक्शन डिपार्टमेंट शिफ्ट इंचार्ज आणि प्लॅन्ट ऑपरेटर हे ७ इसम जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्याविरुध्द घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -