Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र "सत्तेसाठी निष्ठा विकून खाल्ली..." दिलीप वळसे-पाटील यांच्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाडांनी घेतला समाचार

“सत्तेसाठी निष्ठा विकून खाल्ली…” दिलीप वळसे-पाटील यांच्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाडांनी घेतला समाचार

Subscribe

जनतेने एकदाही बहुमत देऊन शरद पवार यांना मुख्यमंत्री केले नाही, अशी टीका अजित पवार गटाचे नेते आणि शरद पवार यांचे अनेक वर्ष विश्वासू सहकारी राहिलेले दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.

मुंबई : जनतेने एकदाही बहुमत देऊन शरद पवार यांना मुख्यमंत्री केले नाही, अशी टीका अजित पवार गटाचे नेते आणि शरद पवार यांचे अनेक वर्ष विश्वासू सहकारी राहिलेले दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. वळसे पाटील हे सध्या महायुतीच्या तीनचाकी सरकारमध्ये सहकार मंत्री आहेत. पण त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या टीकेनंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याबाबत आता नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वळसे-पाटलांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. याबाबतचे ट्वीट आव्हाडांनी केले आहे. (Jitendra Awad’s criticism of Dilip Valse-Patil’s statement)

हेही वाचा – ‘तुरुंगाच्या भीतीने भूमिका बदलणाऱ्या भेकड प्रवृत्तींना सामान्य लोक वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहाणार नाही’

- Advertisement -

महिन्याभरापूर्वी शिवसेना पक्षाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली आणि राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांच्या पुतण्यानेच म्हणजेच अजित पवार यांनी पक्षाला खिंडार पाडल्याने मोठा भूकंप झाला. त्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा नव्याने पक्षबांधणीला सुरुवात केली. पक्षाला पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी शरद पवारांनी दोन जाहीर सभा घेतल्या आहेत. यातील पहिली सभा नाशिक जिल्ह्यातील छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात तर दुसरी सभा ही धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये झाली. शरद पवार यांची सभा झाल्यानंतर त्यांच्या सभेला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात येत असते. त्याचमुळे की काय पवारांचे विश्वासू सहकारी असलेल्या दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून खोचक टीका करण्यात आली.

दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही, याच आश्चर्य वाटते. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले. वळसे पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही… पण आदरणीय साहेबांच्यासाठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांन विषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही. आंबेगाव धडा शिकवेल” अशा आशयाचे ट्वीट आव्हाडांनी केले आहे.

- Advertisement -

 आव्हाडांच्या या ट्वीटनंतर आता अजित पवार गटाकडून काही उत्तर देण्यात येते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण आव्हाडांनी सत्तेचा मुद्दामध्ये आणत अजित पवार गटाला लक्ष केले. सत्तेत गेलेल्यांनी आपली निष्ठा ही विकून खाल्ल्याचा टोला लगावला आहे. तर वळस-पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी खंत देखील व्यक्त केली आहे.

काय म्हणाले होते दिलीप वळसे-पाटील?

शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असे आपण म्हणतो. परंतु महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात, अशी खोचक टीका वळसे-पाटील यांनी केली. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी असे वक्तव्य केले आहे. खरं तर दिलीप वळसे-पाटील हे पवारांचे एकेकाळचे स्वीय्य सहाय्यक राहिलेले आहे. त्यामुळे त्यांचे पवारांशी अत्यंत घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. त्यांचा राजकारणातील प्रवास हा देखील अत्यंत चर्चेचा विषय ठरलेला आहे.

- Advertisment -