लेकीच्या लग्नात मंत्री जितेंद्र आव्हाड झाले भावूक, डोळ्यात आनंदाश्रू!

Jitendra Awhad became emotional Daughter natasha awhad and alen patel register marriage
लेकीच्या लग्नात जितेंद्र आव्हाड झाले भावूक, पहा फोटो

आक्रमक अशी प्रतिमा असलेले आणि नेहमीच रोखठोकपणे चर्चेत राहणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी आपल्या लाडक्या लेकीच्या विवाह सोहळ्यात भावुक झाल्याचे पाहण्यास मिळाले. लाडक्या लेकीच्या लग्नात डॉ. आव्हाड यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी लेकीच्या इच्छेप्रमाणे साधेपणाने आपल्या ठाण्यातील ‘नाद’ बंगल्यावर नताशा यांचा एलन पटेल यांच्यासोबत ’शुभमंगल’ विवाह नोंदणीकृत पध्दतीने दोन्ही कुटुंबातील मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत पार पाडला.

गृहनिर्माण मंत्री असताना, मागील काही दिवस त्यांच्या घरी लग्नाचा विधी साधेपणाने सुरु होता. याविषयीची सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत गृहनिर्माण मंत्री जेजुरीला देवाचा गोंधळ घालताना दिसून आले होते. पांरपरिक पध्दतीनुसार लग्नाआधीच्या सर्व विधी पार पडल्यानंतर मंगळवारी विवाह नोंदणीकृत पध्दतीने नताशा आणि एलन यांचा ’शुभमंगल’ ठाणे विवाह नोंदणी अधिकारी अनिल यादव यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी गृहनिर्माण मंत्री आव्हाड, पत्नी ऋता आव्हाड आणि मुलाकडील आई, वडील आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

ठाण्यात १९ जोडप्यांच्या ‘लग्नाची गॊष्ट’
एकीकडे गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांची कन्या नताशा हिच्यासह ठाण्यात विवाह नोंदणी पद्धतीने १९ जोडप्यांनी आपल्या लग्नाच्या गाठी बांधल्या. नताशा आणि एलन यांचे ’शुभमंगल’ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पार पडले. त्याच्यापूर्वी आणि त्याच्यानंतर ठाणे विवाह नोंदणी कार्यालयात १८ जणांनी आपला लग्नाचा बार उडवत आनंदाच्या ’नव्या इनिंग’ला सुरुवात केली आहे.

माझ्या मुलीने ज्या पध्दतीने आतापर्यंत सांगितले त्यानुसार मी तिचे वडील म्हणून ते ते तिच्यासाठी केले. तिनेच साध्या पध्दतीने विवाह करण्याची मागणी केली होती. मी गृहनिर्माण मंत्री असलो तरी आधी एका मुलीचा वडील आहे. त्यामुळे तिचे हट्ट पुरविणे हे माझे कर्तव्य आहे.
– डॉ. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री