मुंबई : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तपासाला वेग आला आहे. आज सोमवारी (ता. 30 डिसेंबर) सीआयडीचे पथक बीडमध्ये दाखल झाले असून या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड आत्मसमर्पण करण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. पण या प्रकरणी आणि वाल्मीक कराडबाबतचा मोठा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र त्यामध्ये वाल्मीक कराडचे नाव नसल्याचे आमदार आव्हाड यांनी सांगितले आहे. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Jitendra Awhad big revelation about Walmik Karad)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी (ता. 30 डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत म्हटले की, मी आका काका म्हणणारा नाही, मी थेट मुंडे यांचे नाव घेणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड या प्रकरणात आरोपी आहे, मात्र अद्याप जाणीवपूर्वक त्याच्यावर कारवाई होत नाहीये. कारण लोकांची मेमरी शॉर्ट आहे, ज्यामुळे काही दिवसांमध्ये लोक ते विसरून जातील, याची वाट ते (सरकार) पाहात आहेत, असा थेट आरोपच आव्हाड यांनी केला आहे. तर, या हत्याप्रकरणी 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यामध्ये वाल्मीक कराडचे नाव नाही, असाही आरोप आव्हाड यांनी केला आहे. तर, तुम्ही दाऊदला फरफटत अणणार होते. मग वाल्या कराडला आणायला काय हरकत आहे? असा गंभीर सवालही आव्हाडांनी उपस्थित केला.
हेही वाचा… Santosh Deshmukh Murder Case : आका आणि आकाच्या आकामध्ये द्वंद्व; आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
हिवाळी अधिवेशनात सभागृहात या प्रकरणी मोक्का लावू, असे सांगितले होते. मात्र, अद्यापही तशा कोणत्याही प्रकारची कारवाई नाही. अजित पवार यांनी अद्यापपर्यंत कोणतीच जबाबदारी घेतलेली नाही. उलट सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांना डोळ्याने खुणावले होते. यामागे त्यांचा उद्देश काय होता? हे मला माहिती नााही, असेही यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. पण ज्यावेळी शरद पवारांचे सरकार होते, त्यावेळी अण्णा हजारेंनी आरोप केल्यावर शरद पवारांनी सुरेश जैन, नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, विजयकुमार गावीत यांचे राजीनामे घेतले होते, अशी माहिती यावेळी आव्हाडांकडून देण्यात आली.