ठाण्यात SRA ची गरजच काय? हे कार्यालय बंद करा; जितेंद्र आव्हाडांची मागणी

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईच्या बेस्ट बसवरील जाहिरातींवरुन सरकाला घेरले आहे.

ठाण्यात क्लस्टरच्या एसआरए योजनेला काही भागांत फटका बसला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एसआरएविरोधात प्रश्न उपस्थित करत हे कार्यालय बंद करण्याची मागणी आव्हाडांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता ठाण्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) ची गरजच काय? हे कार्यालय आता बंद करा. या कार्यालयामध्ये 17 Scheme दाखल करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत 10 तरी झोपडपट्ट्यांची कामे सुरु झाली असती. पण, अतिमहत्वकांक्षा बाळगल्यामुळे त्या सगळ्यांना क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आले, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

आता हे नवीन क्लस्टर होणार कधी? गोरगरीबांना घरे मिळणार कधी ? तोपर्यंत या गोरगरीबांनी फक्त झोपडपट्टीतच राहायचे. धन्य आहे सरकार ! शिंदे साहेब जरा गोरगरीबांकडेही बघा, असं ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत क्लस्टरचे 44 युआरपी तयार झाले आहेत. त्यातील 5 युआरपीचे नकाशे अंतिम करण्यात आले आहेत. मात्र उर्वरीत युआरपी अद्यापही अंतिम झालेले नाहीत. परंतु आता पुनर्विकासाच्या छोटया इमारतींना देखील क्लस्टर अडसर ठरत असल्याचे दिसत आहे. ठाण्याच्या विविध भागात धोकादायक झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासात अनेक अडथळे असतांना आता क्लस्टरचा देखील अडथळा ठरत आहे. एखादी सिंगल इमारत पुनर्विकासासाठी काढली की त्यासाठी आता क्लस्टरचे ना हरकत प्रमाणपत्र आणा अशी अट घालण्यात आली आहे. परंतु हा दाखला आणण्यासाठी गेल्यानंतर तुमचा परिसर हा क्लस्टरमध्ये जात असल्याने तुम्हाला परवानगी देता येऊ शकत नाही. असे उत्तर पालिकेच्या क्लस्टर सेलकडून दिले जात आहे. त्यामुळे शहरातील अनेक छोटया इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.

क्लस्टरचा पुनर्विकासाच्या इमारतींना देखील फटका असल्याची माहिती समोर आल्यानंतर भाजप आमदार संजय केळकर यांनी या विरोधात आवाज उठविला आहे. तसेच त्यांनी या संदर्भात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून त्यामध्ये अनेक एसआरए प्रकल्प दृष्टीपथात असतांना काही ठिकाणची झोपडपट्टी एसआरए म्हणून घोषीत झाली आहे. असे असताना त्याठिकाणी देखील क्लस्टर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय चुकीचा असून ज्या ठिकाणी एसआरए योजना घोषीत आहे, तेथून क्लस्टर वगळण्यात यावे, अशी मागणी केळकर यांनी त्या निवेदनात केली आहे.


हेही वाचा : राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे संकट? शेतकरी चिंतेत, हवामान विभागाकडून अलर्ट