Homeमहाराष्ट्रJitendra Awhad : मविआत फूट? राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर आव्हाडही म्हणाले - त्यांना...

Jitendra Awhad : मविआत फूट? राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर आव्हाडही म्हणाले – त्यांना थांबवणारे आम्ही कोण?

Subscribe

राऊतांनी आगामी महानगरपालिकांसाठी हा स्वबळाचा नारा दिला आहे. राऊतांच्या या विधानामुळे मविआत काही आलबेल नसून आता ही फूट उघडपणे पडल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यानंतर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही स्पष्टपणे भाष्य केले आहे.

मुंबई : स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकांमध्ये नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय, असे विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज शनिवारी (ता. 11 जानेवारी) प्रसार माध्यमांशी बोलताना केले. ज्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कारण राऊतांनी आगामी महानगरपालिकांसाठी हा स्वबळाचा नारा दिला आहे. राऊतांच्या या विधानामुळे मविआत काही आलबेल नसून आता ही फूट उघडपणे पडल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यानंतर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार, नेते जितेंद्र आव्हाड यांनीही स्पष्टपणे भाष्य करत त्यांना थांबवणारे आम्ही कोण? असे म्हटले आहे. तर आम्हालाही कोणाला बळजबरीने सोबत घेऊन जाणे जमत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. (Jitendra Awhad expressed clear opinion after Sanjay Raut announcement of contesting elections on his own)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या स्वबळाच्या घोषनेनंतर महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीशी संपर्क साधत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, त्यांची स्वबळावर लढण्याची जर का इच्छा असेल तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? पण विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला हवे होते, असे माझे मत आहे. त्यामुळे ठाकरे गटाने घेतलेला निर्णय हा घाईने घेतलेला निर्णय आहे. ग्राऊंडवरती कार्यकर्त्यांचे मत काय आहे, हे आम्हालाही माहीत आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे, असे मला वाटत नसल्याचे आव्हाडांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार – राऊत

तसेच, त्यांचा पक्ष असल्याने त्यांनी याबाबतचा निर्णय घ्यावा. कारण शेवटी कोणालातरी बळंच सोबत घेऊन जाणे हे आम्हालाही पटणारे किंवा शोभणारे नाही. त्यामुळे असे नाही की त्यांच्याच कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. आमच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. पण शेवटी मतविभागणीचा फटका कसा बसतो, हे आपण विधानसभा निवडणुकीत पाहिले आहे. मविआच्या 45 जागा या मतविभागणीमुळे गेलेल्या आहेत. त्यामुळे हे जर का विसरून राजकीय पाऊल टाकणार असू तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांचा निर्णय आहे, त्यामुळे टीका करून काहीच उपयोग नाही, असेही आमदार जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टपणे म्हटले आहे.