मुंबई : राज्यात महायुतीच्या महाविजयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यात 132 जागांवर विजय मिळवत भाजपा महायुतीतील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. याउलट महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर विजय मिळवता आला आहे. पण या निवडणुकीत मोठाच घोळ घालण्यात आला असल्याची शंका विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी (ता. 25 नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सर्व पराभूत उमेदवारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी ईव्हीएम आणि मतमोजणी अशा विविध गोष्टीवर शंका उपस्थित करत पराभवाचे कारण सांगितले. त्यानंतर आज मंगळवारी (ता. 26 नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सुद्धा बैठक पार पडली. निवडणुकीत मिळालेल्या अपयशाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. ज्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (Jitendra Awhad expressed his anger against EVM due to the election failure)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या चार ते पाच तासात लागल आहे, याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टामध्ये ईव्हीएमच्या विरोधातील लढाई सुरू होती. त्यावेळी सुप्रीम कोर्ट असे म्हणाले की, चार चार दिवस वाया जातात. पण दिवस वाया कसले जातात. कारण या देशाची लोकशाही टिकली तर हा देश टिकेल आणि संविधान वाचेल. सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बसतील. अमेरिकेतील एका निवडणुकीत सात दिवस बॅलेट पेपरची मोजणी सुरू होती. दोन दिवस वाया गेले तर काय होणार आहे. निवडणुकीची प्रक्रियाच चुकीची असणे, यापेक्षा दोन दिवस वाया गेलेले चालतील.
तसेच, 1975-77 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून एकाधिकारशाहीविरोधात आंदोलन केले. त्यानंतर ते आंदोलन इतके पेटले की, त्या सरकारला जावे लागले. आता पूर्वीची लोक राहिलेली नाहीत. त्यामुळे लोकांना त्याग, संघर्ष या गोष्टी फारशा कराव्या वाटत नाहीत. पण शरद पवार हे देशातील एकमेव व्यक्ती आहेत, जे त्याग आणि संघर्षातून तयार झालेले आहेत. त्यामुळे मी शरद पवारांना उघडपणे सांगितले की त्यांना जयप्रकाश नारायण यांच्यासारखी भूमिका घ्यावी. याची किंमत मोजावी लागली तरी चालेल. आपण पाहिजे ती किंमत मोजू, पण या देशाचा रशिया होऊ देऊ नका, कारण विरोधी पक्षाला व्यवस्थितरीत्या संपवून टाकण्याचा कट सत्ताधाऱ्यांनी रचला आहे. तर चार महिन्यांपूर्वी चंद्रपूरची जी जागा 2 लाख 40 हजार मतांनी निवडून येते, ती जागा आता इतक्याच मतांनी पडून एक लाखांनी मागे जाते. एवढे असे काय घडले की, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजय होतो, पण विधानसभा पूर्ण जाते, तेव्हा नेमके काय घडते? असा प्रश्न आव्हाडांकडून उपस्थित करण्यात आला.
तसेच, प्रत्येक गावागावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये एक पॅटर्न तयार झालेला आहे. जिथे प्रत्येकाची मते विभागली गेली आहेत. पण आता लोकशाही आहे, त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की ईव्हीएमचा विरोध करा आणि बॅलेटपेपरवर या. आम्ही निवडणुका हरलो म्हणून बोलत नसून मी याआधी अनेकवेळा याबाबत बोललो आहे. या देशाची लोकशाही संकटात आहे, हे मी अनेकदा सांगितले आहे. ज्या संविधानातून या देशाचे निवडणूक आयोग तयार झाले आहे, ते आयोग आता सरकारटच्या हातातील बाहुले झाले आहे. लोकशाही जगली पाहिजे, म्हणून आयोगाला स्वतंत्र अस्तित्व दिले होते. तर एकट्या राष्ट्रवादीचा पराभव झालेला नाही, त्यामुळे सर्व विरोधकांना विश्वासात घेऊन आता एक जनआंदोलन उभे करावे लागेल. त्याची आम्ही मानसिक तयारी केली असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांना दिली.