मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 26 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चौदाव्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपली. त्यामुळे तत्पूर्वी सरकार स्थापन होणे आवश्यक होते. मात्र अद्याप राज्यात सरकार स्थापन होत नसताना राज्यात राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडियावरून केला आहे. सध्या राज्यात जे काही चालू आहे हेच जर महाविकास आघाडीबाबत घडले असते आणि सरकार स्थापन करण्यास वेळ लागला असता, तर राज्यात कधीच राष्ट्रपती राजवट लागू झाली असती, असा टोलादेखील त्यांनी यावेळी लगावला आहे. (Jitendra Awhad attack on maharashtra government over presidents rule.)
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडल्या आणि त्याचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागला आहे. 26 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे राज्यातील राज्य सरकारची मुदत 26 नोव्हेंबर 2024 समाप्त झालेली आहे याचा पुरावा आहे. संविधानातील तरतुदीनुसार 26 नोव्हेंबर 2024 आधीच नवीन सरकार स्थापन होणे आवश्यक होते. परंतु अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. खरंतरं 26 नोव्हेंबर 2024 नंतर फक्त दोन दिवस कामकाज पाहण्याचा संबंधित मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला अधिकार असतो. त्यानंतर तात्काळ राज्यपालांनी नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करणे आवश्यक असते किंवा राष्ट्रपतींनी ती स्वत:हून लावणे आवश्यक होते. जे की कायद्याला अनुसरुन होते असे आव्हाड यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : Maha Politics : महायुतीच्या नेत्यांचा भेटीगाठींचा सिलसिला; फडणवीसांनी घेतली शिंदेंची भेट
गंभीर बाब म्हणजे भारतीय राज्य घटनेमध्ये काळजीवाहू सरकार अशी कोणतीही तरतूद अस्तित्वात नाही. तरीही महाराष्ट्रामध्ये असंवैधानिक पद्धतीने सरकार चालवले जात आहे. राज्याचे राज्यपाल संघदक्ष स्वयंसेवक आहेत. तीच गत निवडणूक आयोगाची आणि राष्ट्रपतीपदावर बसवलेल्या व्यक्तीची आहे. तसेच लहान मुलांच्या बाहुला-बाहुलीच्या खेळात सुद्धा एकप्रकारचा निरागस प्रामाणिकपणा असतो. परंतु ज्याच्या हाती ससा तो पारधी या न्यायाने भाजपाने संपूर्ण देशाच्या संवैधानिक व्यवस्थेची वाट लावलेली आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सोशल मिडियाद्वारे केला आहे.
Edited By Komal Pawar Govalkar