(Jitendra Awhad) मुंबई : बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच संशय व्यक्त केला आहे. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात धक्कादायक दावा केला आहे. अक्षय शिंदे बलात्कारीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्ष बलात्काऱ्यांना वाचविण्यासाठीच त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप करतानाच, पोलिसांच्या कारभारात शासकीय यंत्रणा हस्तक्षेप करत असल्याने पोलीसच बदनाम होत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात दोन लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी संबंधित शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली. त्याच महिन्याच्या 23 तारखेला झालेल्या कथित चकमकीत अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. तथापि, या आठवड्याच्या सुरुवातीला अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. या चौकशीच्या अहवालात स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर केल्याचा पोलिसांचा दावा हा संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : सहकार क्षेत्राबाबत बोलताना राऊतांनी अमित शहांना सुनावले, म्हणाले –
अक्षय शिंदेचे एन्काऊंटर झाल्यानंतरही विरोधकांनी याबाबत संशय व्यक्त केला होता. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेच्या मुख्याधापकांची आणि विश्वस्तांची मुख्य चौकशी व्हायला हवी होती. पण अक्षय शिंदे याने त्यांच्याबद्दल काही माहिती देण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला संपवल्याचा आरोप डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर आता उच्च न्यायालयानेदेखील हाच संशय व्यक्त केला आहे.
याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी नव्याने दावा केला आहे. बलात्काराचे प्रकरण असल्याने लोक घाबरत आहेत. म्हणूनच अक्षय शिंदेबाबत बोलायला कोणी तयार नाही. काही बोलले तर समाज अंगावर येईल, अशी भीती लोकांना वाटत आहे. पण, अक्षय शिंदेने बलात्कारच केला नाही. बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली, असा दावा आव्हाड यांनी केला. (Jitendra Awhad: Jitendra Awhad’s shocking claim about Akshay Shinde)
हेही वाचा – Walmik Karad : वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच येणार; धनंजय मुंडे जगमित्र कार्यालयात