पंतप्रधान मोदींच्या ‘दिवा’ आवाहनाला रोहीत पवारांचा पाठिंबा तर आव्हाड-मलिकांचा विरोध!

jitendra awhad nawab malik criticizes modi, rohit pawar supports

देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आत्तापर्यंत २३०१ पर्यंत पोहोचली आहे. मृतांचा आकडा देखील हळूहळू वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच ३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित करणार असं वृत्ता आल्यानंतर सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली होती. याआधी जेव्हा मोदींनी संवाद साधला होता, तेव्हा देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यामुळे आता कोरोनासंदर्भात पंतप्रधान कोणती नवी घोषणा करणार? याची उत्सुकता सर्वत्र होती. मात्र, मोदींनी आपल्या व्हिडिओमध्ये कोणतीही नवी घोषणा न करता येत्या ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातले दिवे बंद करून साधा दिवा किंवा टॉर्च किंवा मेणबत्ती किंवा मोबाईल फ्लॅश लाईट लावण्याचं आवाहन केलं. कोरोनाविरोधात सगळ्या देशवासियांची एकजूट यातून दिसेल, असंही ते म्हणाले. पण मोदींचं हे आवाहन महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या पुरेसं पचनी पडलेलं दिसत नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोदींच्या आवाहनावर सडकून टीका केली आहे.

हा तद्दन मूर्खपणा – जितेंद्र आव्हाड

राज्याते गहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींच्या आवाहनावर टीका करताना म्हटलंय, ‘प्रत्येक गोष्टीमध्ये इव्हेंट करायचा प्रकार म्हणजे तद्दन मूर्खपणा, बालिशपणा, नादानपणा आहे. मी माझ्या घरातली लाईट चालू ठेवणार आणि एकही मेणबत्ती पेटवणार नाही. मी मूर्ख नाही’, असं म्हणतानाच आव्हाडांनी मोदींवर टीका केली. ‘संपूर्ण देशाला आशा होती की मोदीसाहेब जीवनावश्यक वस्तू, नागरिक उपाशी झोपणार नाही, मास्क-सॅनिटायझर आणि औषधे यांच्या तुटवड्यावर; आम्ही नवीन लस शोधून काढतोय; टेस्टींग किट कमी पडणार नाहीत, यावर बोलतील. देशामध्ये अवघड परस्थिती आणि भयग्रस्त जनतेला आधार देण्याबाबत बोलतील, असे वाटले होते. पण, त्यांनी नवीनच इव्हेंट काढला’, असं ते म्हणाले.

चूल कशी पेटेल असं साहेब बोलतील वाटलं होतं – नवाब मलिक

दरम्यान, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील यावर टीका केली आहे. ‘वाटलं होतं लोकांची चूल पेटवण्यासंदर्भात बोलतील. परंतु साहेब दिवा पेटवण्याचा संदेश देऊन गेले’, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे. ‘नरेंद्र मोदी यांनी आज ९ वाजता देशवासियांना संबोधित केले. मात्र या भाषणातून देशवासियांच्या पदरात पुन्हा एकदा निराशा पडली आहे’, असेही नवाब मलिक यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आधी टाळ्या, आता दिवे – बाळासाहेब थोरात

‘कोरोनाचे संकट आणखी गंभीर होत चालले आहे. अशावेळी आपल्या पंतप्रधानांनी मागे टाळ्या वाजवायला लावल्या, आता दिवे लावायला सांगत आहेत. पंतप्रधान असल्यासारखे मोदी वागणार आहे का? देशाचे प्रमुख म्हणून काही निर्णय घेणार आहे का? आज गरज आहे, मेडिकल इक्विपमेंट पुरविणे, जास्तीत जास्त राज्यांना मदत करणे, नागरिकांना धीर देणे. हे सोडून पंतप्रधान दिवे लावायला लावत आहेत, हे पंतप्रधानांचे काम आहे का?’ अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

रोहीत पवारांनी मात्र केलं स्वागत!

दरम्यान, एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मोदींवर टीका केलेली असतान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार, यांनी मात्र मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा हेतू असावा. तसं असेल, तर त्यांचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करू, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो’, असं ट्वीट रोहीत पवार यांनी केलं आहे.

हे सगळं सुरू असताना महाविकासआघाडीमधला प्रमुख पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. या सगळ्या प्रकारामुळे मोदींना विरोध करण्यात महाविकासआघाडीमध्ये काहीसा मतभेदच दिसून येत असल्याचं चित्र आहे.


CoronaEffect: मोदींचं ५ तारखेला दिवे लावायचं आवाहन, पण नेटिझन्स आत्ताच पेटले!