मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार आपला ट्रॅक बदलू शकतात. ते कोणत्याही बाजूला जाऊ शकतात. शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहणार नाहीत, असे विधान खासदार नारायण राणे यांनी केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार हे खरंच शिवसेना ठाकरे गटाला आणि काँग्रेसला बाजूला सारत भाजपाशी हातमिळवणी करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण खासदार नारायण राणे यांच्या या विधानावर आता आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Jitendra Awhad reply to Narayan Rane statement about Sharad Pawar)
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी (ता. 22 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना खासदार नारायण राणे यांनी शरद पवारांविषयी केलेल्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. राणेंच्या या विधानाला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, नारायण राणे यांना सल्ला आहे, तुम्ही किती पक्ष बदलले ते बघा, तीन पक्ष बदलेल्या माणसाने शरद पवारांना सांगू नये, तुम्ही तुमचे बघा, असे थेट उत्तर आव्हाडांकडून देण्यात आले आहे. कारण नारायण राणे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेपासून केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पण याही पक्षातून बाहेर पडत त्यांनी स्वतः महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापन केली. पण भाजपात प्रवेश करताना त्यांनी त्यांचा हा पक्ष भाजपामध्ये विलीन केला.
हेही वाचा… Narayan Rane : विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार… राणेंचा खळबळजनक दावा
काय म्हणाले नारायण राणे?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार आपला ट्रॅक बदलू शकतात. शरद पवार कुठल्याही क्षणी त्यांच्या पक्षातील आमदारांच्या हितासाठी राज्याच्या हिताचा निर्णय घेऊ शकतात, असे मला वाटते. तसेच शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहणार नाही. पवार विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीसोबत जाऊ शकतात, असे नारायण राणे म्हणाले आहेत. तसेच त्यामुळे राज्यात कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार नाही आणि उद्धव ठाकरे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असेही भाकित त्यांनी केले आहे. तसेच उद्याच्या (शनिवार, ता. 23 नोव्हेंबर) निकालानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना रस्त्याने चालणे देखील कठीण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.