‘पवारांचे ४० वर्षांपासून ST कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध, त्यांचं शोषण करणाऱ्यांना ते खड्यासारखं बाजूला ठेवतील’

गेल्या ४० वर्षांपासून एसटी कामगारांच्या समस्या आणि एस.टी. कामगारांशी आदरणीय शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या समवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय? असा सवाल गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Jitendra Awhad and Sharad Pawar

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेले तीन आठवडे एसटी कर्मचारी संपावर आहेत. हा संप मिटवण्याच्या दृष्टीने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत चार तास चर्चा केली. दरम्यान, शरद पवार यांच्या उपस्थितीवरुन काहींनी प्रश्न उपस्थित केले. यावर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

गेल्या ४० वर्षांपासून एसटी कामगारांच्या समस्या आणि एस.टी. कामगारांशी आदरणीय शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या समवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय? असा सवाल आव्हाड यांनी केला. ऊसतोड कामगारांच्या बैठकीचा अंतिम मसुदा देखील पवारांच्या उपस्थितीत गोपीनाथ मुंडे मंजूर करून घ्यायचे. मुंडेंना ऊसतोड कामगारांबद्दल प्रचंड सहानुभूती होती आणि शरद पवारांनीही ऊसतोड कामगारांची जबाबदारी स्वीकारली होती, असं आव्हाड म्हणाले.

नेत्यांनी अत्यंत जबाबदारीने श्रमिकांचा विचार केला पाहिजे. त्यांचे शोषण थांबवलं पाहिजे. जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्या शोषणाला, त्यांना उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतात; त्यांना खड्यासारख बाहेर ठेवलं पाहिजे. आणि तेच काम शरद पवार करतील, असा विश्वास डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.