घरमहाराष्ट्रकरोना: 'त्या' ट्विटबाबत जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी

करोना: ‘त्या’ ट्विटबाबत जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी

Subscribe

राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या चुकीच्या ट्विटमुळे गोंधळ निर्माण झाला होता. आता त्यांनी माफी मागितली आहे.

राज्यात करोना व्हायरसशी लढा देण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. गर्दीमुळे करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव अशी अनेक ठिकाणं ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. गर्दी कमी करण्यासाठी सरकरने खाजगी कंपन्यांना ५०% मनुष्यबळाबर काम करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अनावश्यक सेवा बंद करण्याचेही निर्देश सरकारने दिले आहेत. असं असताना सरकारी कर्मचाऱ्यांचं काय? हा प्रश्न देखील सर्वांना पडला होता. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या विषयावरही चर्चा झाली. त्यात सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार नाही असा निर्णय झाला. मात्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटमुळे राज्यात एकच गोंधळ उडाला.

काय होते ट्विट?

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठे आणि महत्वाचे पाऊल  उचलले आहे.  पुढील सात दिवस सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

जितेंद्र आव्हाडांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट केले गेले होते. त्यामुळे या ट्विटमधील माहितीला अधिकृत मानत अनेक वृत्तसंस्थांनी ‘पुढील सात दिवस सर्व सरकारी कार्यालये बंद राहतील’ असे वृत्त प्रसारित केले. यामुळे राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काही वेळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. म्हणजेच आव्हाडांच्या ट्विटमधील माहिती खोटी असल्याचे समोर आले. मात्र तोपर्यंत राज्यात या खोट्या बातमीमुळे बराच गोंधळ निर्माण झाला होता.

- Advertisement -

आव्हाडांची सारवासारव

दरम्यान आपल्या ट्विटमुळे मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आपले ट्विट डिलीट केले आणि पुन्हा ट्विट करून झालेल्या प्रकाराबद्दल सारवासारव करत नवीन ट्विट केले. त्यात ते म्हणाले कि, माझ मीडिया अकाऊंट सांभाळणाऱ्या व्यक्तीने चुकीची माहिती देऊन गैरसमज आणि गोंधळ निर्माण केला. मला याबद्दल माहिती नव्हती, माध्यमांमधून मला हे कळले. मला याबद्दल वाईट वाटत असून झालेल्या प्रकाराबद्दल क्षमस्व. माझे मीडिया अकाऊंट संभाळणाऱ्याने माझ्या अकाऊंटचा गैरवापर केला, त्याला याबद्दल शिक्षा होईल.

- Advertisement -

जबाबदारीने ट्विट करा

गृहनिर्माण मंत्र्यांच्या या चुकीच्या ट्विटमुळे राज्यभरात गोंधळ निर्माण झाल्याने नेटकाऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आणि त्यांच्या माफीबद्दल ट्विटवर ना-ना प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकीकडे मुख्यमंत्री आणि पूर्ण प्रशासन करोनामुळे त्रस्त आणि व्यस्त असताना सरकारमधील मंत्र्यानेच असा गोंधळ निर्माण केल्याने आव्हाडांवर टीका होताना दिसतेय. ट्विटरवर अनेकांनी त्यांना जबाबदारीने ट्विट करण्याचा सल्लाही दिला आहे.


हेही वाचा – करोना व्हायरस : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरूच राहणार – पंतप्रधान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -