महाराष्ट्राचं नशीब असं काही घडलं नाही; पवारांच्या घरावरील हल्ल्यावर आव्हाडांचं मोठं वक्तव्य

Jitendra Awhad and Sharad Pawar

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाची मागणी उच्च न्यायालयात फेटाळली गेल्याने संतप्त झालेल्या आंदोलक एसटी कर्मचार्‍यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. यानंतर सर्वच स्तरातून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या. राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माणमंत्री डॉ.. जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांना शारीरिक इजा करायची होती. महाराष्ट्राचे नशीब असं काही घडलं नाही, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट गंभीर दावा केला आहे. शरद पवार यांच्या घरी हल्ला झाला, त्या हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ नव्हता. ज्यांनी हल्ला केला त्यांनी घराची रेकी केली होती, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. “परवा साहेबांच्या घरी हल्ला झाला हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वछ नव्हता त्यांनी साहेबांच्या घराची रेकी केली होती आणि त्यांना पवार साहेबाना शारीरिक इजा करायची होती…महाराष्ट्राचे नशीब असे काही घडले नाही…” असं डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सदावर्तेंना २ दिवसांची पोलीस कोठडी

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचार्‍यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर इतर १०९ आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. गुणरत्न सदावर्ते यांना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत राहावे लागणार आहे.

८ एप्रिलला रात्री गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीवेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाला. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सदावर्तेंच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, पण त्यांनी कामगारांना भडकावले हे कसे ठरवणार? आरोपांची संख्या मोठी असल्याने त्यांची चौकशी कशी करणार? अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. त्यावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगितले, तसेच यामागे सदावर्ते असून अजून त्यांच्यासोबत कोण कोण आहेत याची चौकशी आम्हाला करायची आहे. काही कामगार दारू पिऊन आल्याचाही आम्हाला संशय आहे. ते नक्की एसटी कर्मचारीच आहेत की इतर कोणी याची शहानिशा करायची असल्याने त्यांना कोठडी द्यावी, अशी मागण घरत यांनी न्यायालयाकडे केली.

पवारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत होणार वाढ

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानावर एसटी कर्मचार्‍यांनी हल्ला करीत दगड आणि चप्पलफेक केली. तसेच महिलांकडून बांगड्या फोडण्यात आल्या. या घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत शरद पवार आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.