घरमहाराष्ट्र२०१४ साली भाजपला पाठिंबा देऊन आम्ही पायावर कुर्‍हाड मारून घेतली-जितेंद्र आव्हाड

२०१४ साली भाजपला पाठिंबा देऊन आम्ही पायावर कुर्‍हाड मारून घेतली-जितेंद्र आव्हाड

Subscribe

माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २०१४ साली भाजपला पाठिंबा देऊन स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली. आमच्या नेत्यांनी स्वतःसाठी पवारांचे नाणे विकण्याचा प्रयत्न केला. माझ्या पक्षात मला निर्णय प्रक्रियेत आजही समाविष्ट करुन घेतले जात नाही. हे माझे दुर्दैव आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. मंगळवारी मायमहानगरच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मुलाखत देताना ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सध्या अनेक नेते पक्षांतर करत आहेत. याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, राज्यात सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या बेरोजगारीतूनच स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेरोजगार एका पक्षातून दुसर्‍या पक्षात स्थलांतरीत होत आहेत. बेरोजगारी इतकी वाढली की सत्ताधारी पक्षात जाऊन अगदी भांडी घासायचीही नेत्यांची तयारी आहे, या दलबदलू लोकांना निष्ठा यावर विश्वास नसून सत्ता हेच त्यांच्यासाठी महत्वाचे आहे.

गणेश नाईकांनी राष्ट्रवादी खड्ड्यात घातली

गणेश नाईक राष्ट्रवादी सोडणार हे 2014 मध्येच ठरले होते. या संदर्भात मी वारंवार पक्षाला सांगत होतो, मात्र पक्षाने नेहमी नाईकांना वरची बाजू दिली आणि माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. मागील पाच वर्षात नाईकांनी राष्ट्रवादी संपवली असा आणि आज पक्ष अडचणीत असताना पक्षाला उभारी देण्याऐवजी ते आपला स्वार्थ साधण्याचे काम करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

- Advertisement -

पुन्हा एकदा आम्ही पक्ष उभा करू आणि त्याची सुरुवात नवी मुंबईतूनच करू असा विश्वास व्यक्त करताना आव्हाड भावूक झाले होते. मागील काही दिवसांपासून नाईक कुटुंब हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरू होती. त्यानंतर मंगळवारी संदीप नाईक यांनी आपला राजीनामा दिला आणि सुरू असलेल्या या चर्चांना पूर्णविराम लागला. वर्ष 2014 मध्येच नाईक हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. परंतु साहेबांनी नाईक हे आपले बंधुतुल्य सहकारी असल्याचे सांगत ते कधीही गद्दारी करणार नाहीत, असे सांगितले होते.

मागील पाच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला खड्ड्यात घातले. कल्याण डोंबिवलीत सत्ता असताना आज त्याठिकाणी एकही राष्ट्रवादीचा नगरसेवक नाही, हीच परिस्थिती भिवंडी आणि मिरा भाईंदरमध्येही होती. या सर्वाचे नेतृत्व कोण करीत होते, तर ते नाईकच होते. घरी बसून पक्ष चालत नाही, हे त्यांना समजायला हवे होते. मात्र राष्ट्रवादीला संपविण्याचा विडाच त्यांनी उचलला होता. असा आरोपही त्यांनी केला.

- Advertisement -

‘मी धोक्याची सूचना दिली होती पण पक्षाने दुर्लक्ष केले’
स्वाभिमानाच्या गप्पा मारणार्‍या गणेश नाईक यांच्या विरोधात आमदार मंदा म्हात्रे वाट्टेल ते बोलत आहेत. नाईक यांना आम्ही स्वीकारणार नाही असे भाजपचे अध्यक्ष बोलत आहेत. असे असतानाही नाईकांचा स्वाभिमान आता कुठे गेला? असा प्रश्न आव्हाडांनी विचारला. राष्ट्रवादीने नाईक कुटुंबाला अख्खी नवी मुंबई दिली होती. सर्व महत्वाची पदे त्यांच्या घरात होती. असे असतांनाही त्यांनी गद्दारी केली. नवी मुंबईचा विकास झाला हे मान्य जरी केले तरी त्यात नाईकांनी आपल्या घराच्यांचाच विकास अधिक केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मला हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत होते. मात्र पक्षाकडूनच याची दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र आता हा पक्ष पुन्हा एकदा उभा करू आणि त्याची सुरुवात नवी मुंबईतूनच करू असा विश्वास आव्हाडांनी शेवटी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -