मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टरमाईंड म्हणून ज्याचे नाव घेतले जाते त्या वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. वाल्मीक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने तीन दिवसांच्या उपचानानंतर त्याची पुन्हा बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मात्र वाल्मीक कराडच्या आजारपणाबद्दल आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनीही शंका उपस्थित केली होती. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मीक कराडच्या दिमतीला सात हवालदार तैनात असल्याचा दावा केला आहे. (Jitendra Awhad serious allegations regarding Beed District Jail where Walmik Karad is located)
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करताना म्हटले की, रुग्णालयामधून बाहेर काढलेल्या वाल्मीक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. मात्र बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे-मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात आणि त्यानंतर या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होत आहे. अशाने बीड कारागृहात ते ‘आपोआप’ वाल्मिक कराडच्या जवळ पोहचतात आणि मग रात्री मस्त मैफल रंगत असते, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला.
हाॅस्पीटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे – मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 27, 2025
महायुतीवर निशाणा साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एकंदरीत तो (वाल्मीक कराड) कारागृहात आहे, अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही, असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो. बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असे कधी बघितलेले नाही की, कायद्याने जामीन नाकारलेल्या इसमासाठी एवढे हवालदार दिमतीला तैनात केले आहेत. अर्थात, तो वाल्मीक कराड आहे. वाल्मीक खडा तो वो सरकारसे बडा, असे म्हणत थोडी तरी लाज बाळगा, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
वाल्मीक कराडवर आयसीयूमध्ये उपचार
दरम्यान, 22 जानेवारी रोजी रात्री उशिरा वाल्मीक कराडच्या पोटात दुखू लागले, तसेच त्याला अस्वस्थही वाटू लागले होते. त्यामुळे त्याला रात्री पावणेबाराच्या सुमारास जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी वाल्मीक कराडची तपासणी केल्यानंतर त्याला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. तसेच त्याच्या मधुमेह आणि रक्तदाबाची तपासणीही यावेळी करण्यात आली होती. यानंतर तीन दिवसांनी वाल्मीक कराडला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले. या काळात डॉ. अशोक थोरात यांनी कराडवर उपचार केल्याची माहिती समोर येत आहे. ज्यांनी सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला होता. त्यामुळे विरोधक पुन्हा एकदा टीका करताना दिसत आहेत.