घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023आव्हाडांना धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याच्या मालमत्तेची चौकशी करा; अंबादास दानवेंची विधान परिषदेत मागणी

आव्हाडांना धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याच्या मालमत्तेची चौकशी करा; अंबादास दानवेंची विधान परिषदेत मागणी

Subscribe

मुंबईः आमदार जितेंद्र आव्हाड व त्यांच्या कुटुंबियांना धमकी देणाऱ्या ठाणे महापालिका अधिकाऱ्याच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. तसेच याप्रकरणी तीव्रतेने कारवाई करावी, अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.

आव्हाड यांना मिळालेल्या धमकीचा मुद्दा विरोधी पक्षनेते दानवे यांनी विधान परिषदेत मांडला. आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी देणाऱ्या ठाणे पालिका अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांचे कवच आहे. ही बाब योग्य नाही. संबंधित अधिकाऱ्याच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात केली.

- Advertisement -

दानवे यांच्या मागणीची उपसभापती निलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्या अधिकाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे निर्देश उपसभापती गोऱ्हे यांनी दिले. मात्र ही अतिशय गंभीर बाब असून निषेधार्ह आहे. या प्रकरणात त्या अधिकाऱ्याची स्थानिक पोलिसांशी ओळख असल्याने सीआयडीकडून याची चौकशी केली जाईल. संभाषणाची एक ऑडिओ सीडी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवली आहे. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली. आव्हाड व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा दिली जाईल. लोकप्रतिनिधींना अशी धमकी दिली जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आव्हाड यांची मुलगी आमच्याही मुलीसारखी आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

- Advertisement -

आव्हाड यांना मिळालेल्या धमकीचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. यासाठी विशेष अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सध्या तरी हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्याची आवश्यकता नाही, पण सीआयडीच्या तपासात काही तथ्य आढळल्यास याचा तपास निश्चितच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग केला जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -