मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचे याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. अजित पवार गटाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बोगस शपथपत्रे सादर करण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. याचाच संदर्भा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर शरसंधान केले आहे.
हेही वाचा – नरेंद्र मोदी अन् आदित्य ठाकरेंचा ब्रॅण्ड एकच; संजय राऊतांचा पंतप्रधानांवर निशाणा
शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात उभी फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. त्यानंतर त्याने पक्ष तसेच निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. यासंदर्भात काल, सोमवारी निवडणूक आयोगासमोर जी सुनावणी झाली, त्यामध्ये फुटीर राष्ट्रवादी गटाच्या बनावटगिरीची अनेक उदाहरण आम्ही समोर आणून तर दिलीच, शिवाय त्यासोबतच अशा बनावटगिरीविरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले विविध 27 निकालपत्रे देखील आम्ही आयोगासमोर ठेवली, असे राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
आज निवडणूक आयोगासमोर,जी सुनावणी झाली त्यामध्ये,फुटीर राष्ट्रवादी गटाच्या बनावटगिरीचे अनेक उदाहरण आम्ही समोर आणून तर दिलीच शिवाय त्यासोबतच सुप्रीम कोर्टाचे असे बनावटगिरी विरोधात दिलेले विविध 27 निकालपत्र देखील आम्ही आयोगासमोर ठेवले.
जेंव्हा एखादा याचिकाकर्ता कोर्टासमोर जातो… pic.twitter.com/P6l5W8aACr— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 20, 2023
जेव्हा एखादा याचिकाकर्ता न्यायालयासमोर जातो, तेव्हा त्याच्यावर ही नैतिक जबाबदारी असते की त्याने संबंधित केसच्या संदर्भात कोणतीही खोटी कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करू नये. अशी फसवेगिरी करणाऱ्या, बनावटगिरी करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या विरोधात यापूर्वी देखील न्यायालयाने अनेक वेळा कठोर पावले उचलली आहेत. किंबहुना, अशा गैरप्रकार करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या याचिका विचारातच घेऊ नयेत, असे देखील विविध न्यायालयांनी अनेक ठिकाणी नमूद करून ठेवलेले आहे, असे आव्हाड म्हणाले.
हेही वाचा – आ बैल, मुझे मार… ‘त्या’ फोटोवरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपाला डिवचले
तब्बल 20 हजार खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या, अशी बनावटगिरी करणाऱ्या लोकांची याचिका ही विचारातच घेऊ नये, अशी भूमिका आमच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर मांडली. त्याचबरोबर कुवर प्रतापसिंह चौधरी हे शरद पवार यांच्या सोबत असताना, त्यांचे नाव फुटीर गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत दाखवल गेले आणि म्हणूनच या प्रकरणाची शहनिशा करण्यासाठी त्यांना आयोगासमोर उभे करण्यात आले. वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडलेल्या सर्व बाबी निवडणूक आयोगाने रेकॉर्डवर घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
आमच्या पक्षाकडून फुटीर गटाच्या बनावटगिरीची सगळी कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. आता याबाबत निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेते, हे बघण्यासारखे असेल. कारण अशा बनावटगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निकालांना निवडणूक आयोगाला असे सहज बाजूला टाकता येणार नाही, असे सांगतानाच, आपले साम्राज्यच बेईमानाच्या भरवशावर उभे करणाऱ्या फुटीर गटातील नेत्यांना, अशी बनावटगिरी एकदमच चिल्लर वाटत असेल, हा भाग वेगळा असा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे.