‘एसटी संप, प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये, कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी’; आव्हाडांना नेमकं म्हणायचंय काय?

ncp leader jitendra awhad

एसटी मंहामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात वाढ केली आहे. मात्र, तरी देखील संप सुरुच आहे. या सगळ्या घडामोडीत राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. एसटी संप, प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये, कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी’ असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांना नेमकं म्हणायचं काय आहे? असा सवाल आता सर्वांना पडला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. हे ट्विट अत्यंत गंभीर असून या ट्विटमधून बरेच अर्थ निघत आहेत. “३५० रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून, ७०,००० कर्मचारी, कर्मचाऱ्यांची लूट, ST संप, कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी,” असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड यांना नेमकं म्हणायचं काय आहे. ७० हजार कर्मचाऱ्यांकडून ३५० रुपये घेतले तर याची आकडेमोड केली असता २ कोटी ४५ लाख रुपये जमा होतात. हे पैसे कोणत्या नेत्यांनी घेतले आहेत का? ते नेते कोण आहेत? नेमकं आव्हाड यांना काय म्हणायचं आहे? असा सवाल आता सर्वांना पडला आहे.

एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात गेले १७ दिवस आंदोलन करत आहेत. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत हे आंदोलनात सहभागी होते. मात्र, सरकारने कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात वाढ केल्यानंतर पडळकर आणि खोत यांनी संपातून माघार घेतली आहे. राज्य सरकारने जी मुळ वेतनात वाढ केली आहे, हा पहिला विजय आहे. जे मिळेल ते पदरात टाकून घ्यायचं, बाकीचं नंतर घ्यायचं, असं पडळकर म्हणाले. जे गेले काही विलीनीकरणासाठी आझाद मैदानात जोरजोरात घोषणा देत होते त्याच पडळकरांनी विलीनीकरण तांत्रिक मुद्द्यात अडकलंय त्याला आम्ही काय करू शकतो? असा सवाल केला. तसंच, आम्ही आंदोलन स्थगित करतो, अशी घोषणा पत्रकार परिषदेत केली.

यानंतर कर्मचाऱ्यांसाठी न्यायालयीन लढा देणारे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांच्यावतिने पत्रकार परिषदेत बोलताना आम्ही पडळकर आणि खोत यांना आंदोलनातून आझाद करतो, अशी घोषणा केली. तसंच, वैयक्तिक आरोप देखील केले.

या सगळ्या घडामोडी घडत असताना डॉ. जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट बरंच काही सांगून जात आहे. परंतु, आव्हाड यांना काय बोलायचं आहे, ते स्वत: आव्हाडच सांगू शकतात.