घरमहाराष्ट्रडॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यानंतर पत्रकार कोरोनाच्या विळख्यात

डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यानंतर पत्रकार कोरोनाच्या विळख्यात

Subscribe

१६७ जणांमध्ये ५३ पॉझिटिव्ह,४१ रिपोटर्स, १२ कॅमेरामनचा समावेश, द फर्न हॉटेलमध्ये केले क्वॉरंटाईन, पत्रकारांनाही विमा सुरक्षेची मागणी

गेले अनेक दिवस आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांप्रमाणे मैदानावर राहून कोरोनाशी दोन हात करणार्‍या मुंबईतील ५३ पत्रकारांना या आजाराची लागण झाल्याचे वास्तव समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत कोरोनाशी संबंधित बातम्या देणार्‍या पत्रकारांची चाचणी मुंबई महापालिकेने केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.कोरोनाच्या संकटाशी प्रत्येकजण आपापल्या परीने लढतोय. या योध्द्यांमध्ये आघाडीवर असणार्‍या डॉक्टर, पोलीस यांना आपलं लक्ष्य केलेल्या कोरोनाने आता मोठ्या प्रमाणात पत्रकारांनाही लक्ष्य केले आहे.

मुंबईत प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन कोरोना संबंधित वृत्तांकनाचे काम करणारे पत्रकार, कॅमेरामन अश्या ५३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी एकत्र येऊन १६७ माध्यमकर्मींची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी ५३ जणांना बाधा झाल्याने त्यांना विलिनीकरणात पाठवून त्यांच्या कुटुंबीयांची चाचणी आता करण्यात येणार आहे. प्रसार माध्यमांतील १६७ लोकांची नुकतीच कोरोना चाचणी घेण्यात आली होती, त्यापैकी ५३ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात ४१ रिपोटर्स आणि १२ कॅमेरामन यांचा समावेश आहे. ५३ पॉझिटीव्ह पत्रकारांना गोरेगावच्या द फर्न हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisement -

या धक्कादायक बातमीमुळे पत्रकारांच्या विमा सुरक्षेच्या मागणीने जोर धरला असून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ५० लाख विमा कवच देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार आणि मुंबई पालिकेच्यावतीने मुंबईतील पत्रकार, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांची कोरोना चाचणी केली होती. प्रसार माध्यमातील १६७ जणांच्या चाचणीतून ५३ जण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे आणखी काही पत्रकारांचे चाचणी अहवाल येणे बाकी आहे. मात्र याबद्दल अधिकृत माहिती अद्याप मुंबई महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य खात्याकडून मिळालेली नाही. भारतात २५ मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला असला तरी माध्यमे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यामुळे माध्यमांचे प्रतिनिधी फिल्डवर काम करत आहेत. फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार अनेक ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी जातात. यावेळी अनेक ठिकाणी त्यांचा कोरोनाबाधित व्यक्तिंशी संपर्क झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पत्रकारांची कोरोना चाचणी घेतली होती, त्या चाचणीतही काही पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर या पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार देखील सुरू करण्यात आले होते. ठाण्यातील प्रसंगानंतर आता मुंबईमध्येही पत्रकारांची चाचणी घेण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे सुत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -