योग्य वेळी न्याय न मिळणं, हा अन्यायच!, संदीप देशपांडे असं का म्हणाले?

Sandeep Deshpande Tweet on Election | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. योग्य वेळी न्याय न मिळणं, हा अन्यायच असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

sandeep deshpande

Sandeep Deshpande Tweet on Elections | नवी दिल्ली – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रलंबित असलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या कामाकाजाची वेळ संपल्याने आज सुनावणी होऊ शकली नाही. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी रखडत असल्याने निवडणुका लांबणीवर पडत आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. योग्य वेळी न्याय न मिळणं, हा अन्यायच!, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणार? SC मध्ये आजही सुनावणी नाहीच!

संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “गेल्या तीन वर्षा पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही आहेत निवडणुका न होणं ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत्य घातक गोष्ट आहे त्यावर प्रलंबित असणाऱ्या निर्णयाला न्यायालयाच्या माध्यमातून उशीर होणं आश्चर्यकारक आहे. justice delayed is justic edenied”

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज, मंगळवारी सुनावणी होणार होती. चौथ्या क्रमांकावर हे प्रकरण होतं. परंतु, दहा मिनिटे आधी तिसऱ्या क्रमांकाचं प्रकरण संपलं आणि कोर्टाने कामकाजच थांबवलं. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे याचिकांवर सुनावणी होणार होती. मात्र, आजचंही कामकाज रखडल्याने आता पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा – अभिजीत बिचुकले आता कसबापेठ निवडणूक लढवणार; म्हणाले, भकास…

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागांची व सदस्यांची संख्या वाढविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय, प्रभागरचनेचे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय, प्रभाग व सदस्यसंख्या पूर्ववत करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, उर्वरित ९६ नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करायचे की नाही, यासह अन्य मुद्दयांवर अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने वाढीव प्रभागसंख्येनुसार प्रभागरचनेचे काम पूर्ण केले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने प्रभागरचनेबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ रखडल्या आहेत. कोरोनामुळे वर्षभर लांबणीवर पडलेल्या निवडणुका आता सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमुळे रखडल्या आहेत. त्यामुळे, याप्रकरणी आजतरी सकारात्मक सुनावणी होईल अशी अपेक्षा होती. मात्र, आज याबाबतचा मुद्दाच चर्चेला घेण्यात आला नाही. त्यामुळे या निवडणुका आता पुन्हा लांबणीवर पडल्या असून पुढील सुनवाणीची तारीख कधी जाहीर होतेय याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या दिरंगाईमुळे राज्यातील अनेक भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून अनेक महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट लागू आहे. यामुळे अनेक विकासकामे रखडली असून नव्या कामांना प्रोत्साहन मिळत नाहीय. यामुळे लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातच आजची सुनावणी पुढे ढकलल्याने निवडणुकांही लांबणीवर पडल्या आहेत. यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.