अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरात अप्पर वर्धा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आंदोलन करुनही न्याय मिळत नाही. मागच्या 103 दिवसांपासून या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. आज अखेर शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलनाला सुरूवात केली. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाग्रस्त शेतकऱ्यांसोबत लवकरच बैठका घेऊन, त्यांना न्याय देऊ, असं आश्वासन शिंदे यांनी दिलं आहे.(Justice will be given soon to the farmers affected by the Upper Wardha project Chief Minister Eknath Shinde s assurance)
मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नीती आयोगाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबई ग्रोथ हब करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचसंदर्भात आज बैठक झाली असल्याचं, शिंदे म्हणाले. मुंबई आणि MMR एक ट्रिलियनचं उद्दिष्ट गाठू शकतं, असा निती आयोगाचा दावा आहे आणि त्याचदृष्टीने काम केलं जाणार असल्याचं, तसंच प्रकल्पांना गती दिली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सोबतच महाराष्ट्रात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांच्या पाठी सरकार ठामपणे उभे
राज्यात काही भागात पाऊस पुरेसा झालेला नाही. काही भागात अजूनही पाऊस नाही, ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही. पण येत्या काही दिवसांत पाऊस पडेल, तसा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं. तसंच, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असंही शिंदे यावेळी म्हणाले.
(हेही वाचा: राज ठाकरेंचे राजकारणातील महत्त्व वाढले? दोन गटांचे आमदार पोहोचले ‘शिवतीर्थ’वर )
सरकारने निर्णय न घेतल्यास आत्महत्या करणार
न्याय मागण्यासाठी या शेतकऱ्यांनी मंत्रालयात लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. शेतकऱ्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी 12 ते 15 शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. तर उद्यापर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे वेळेत सुरू झाल्यास त्याचा राज्यातील नागरिकांबरोबरच औद्योगिक विस्ताराला तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची तातडीने पूर्तता करत प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुंबईतील वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे आहेत तेथे ग्रेड सेपरेटर टाकून वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी मुंबई महापालिकेला निर्देश देण्यात आले. वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरिता ट्विन टनेल या नविन संकल्पनेचा वापर करण्याबाबत मुंबई महापालिकेने सर्व्हे करावा याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग कनेक्ट करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुंबई मेट्रो मार्गिका ४,चार ए, आणि ११ साठी मोगरपाडा येथे डेपो करण्याकरिता जमीनसंपदाच्या विषयाबाबत आढावा घेण्यात आला. मिठी नदी विकास व प्रदूषण नियंत्रण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्तांना यावेळी देण्यात आल्या. ठाणे भिवंडी कल्याण या मुंबई मेट्रो पाचच्या मार्गिकेसाठी कशेळी येथील भूसंपादनाबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.
दक्षिण मुंबई परिसरातील महत्त्वाचे रस्ते, पदपथावर होणारे अतिक्रमण काढून रस्ते, चौक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले. समृद्धी महामार्गालगत इकॉनोमिक झोन करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. निम्न पैनगंगा प्रकल्प मार्गी लावण्याबाबत जलसंपदा विभागाला मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.