यवतमाळ : संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत असून, मंगळवार (ता. 08 ऑगस्ट) आणि बुधवार (ता. 09 ऑगस्ट) हे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी चांगलेच गाजले. तर 137 दिवसांनंतर खासदारकी परत मिळालेल्या राहुल गांधी यांनी संसदेत मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावावर बोलताना सरकारला मणिपूर हिंसाचारावरून चांगलेच धारेवर धरले होते. राहुल गांधी यांच्या भाषणाला उत्तर देताना अमित शहा यांनी राहुल गांधीवर चांगलाच हल्ला चढवला. त्यांनी 15 वर्षाआधी कलावती बांदूरकर यांच्या भेटीचा उल्लेख करीत त्यांचे पुढे काय झाले? असा सवाल करीत टीका केली. राहुल गांधी यांनी त्यांच्या घरी जाऊन जेवण केले पण दिले काहीच नाही, असा दावा अमित शहांकडून काल संसदेत करण्यात आला. पण आता शहांनी केलेल्या दाव्याची पोलखोल स्वतः कलावती यांच्याकडून करण्यात आली आहे. मला मोदी सरकारच्या काळात काहीही मिळाले नाही, असे थेट कलावती यांच्याकडूनच सांगण्यात आले आहे. (Kalavati took a dig at Amit Shah saying that she did’nt get anything from Modi government)
हेही वाचा – मोठी बातमी: अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीचे दोन व्हीप
बुंदेलखंडच्या कलावतींचा उल्लेख करत अमित शहा काल लोकसभेत म्हणाले होते की, त्यांना घर, पाणी, वीज व सर्व जीवनावश्यक वस्तू या मोदींनी दिल्या. पण आता स्वतः कलावतींनीच हा दावा खोडून काढला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलावती बांदुरकर या बुंदेखंडच्या नसून त्या महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील जालका गावातील आहेत. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी २००८ मध्ये कलावती यांची भेट घेतली होती.
अमित शहा यांनी केलेल्या दाव्याबाबत बोलताना कलावती यांनी सांगितले की, मला भाजप सरकारने कुठलीच मदत आजपर्यंत केली नाही. माझ्या घरी 2008 मध्ये काँग्रेसचे राहुल गांधी आले. त्यानंतर घरी वीज नळ जोडणी, रेशन कार्ड, घरकुल आणि 30 लाखांची मुदत ठेव करून देण्यात आली. राहुल गांधी यांनी केलेल्या मदतीवर अजूनही घर सुरू असून भाजपकडून कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. तर घरात जी गॅस आहे ती पण मी पैशाने विकत घेतली आहे. मोदी सरकारने गॅसही मोफत दिलेली नाही.
काय म्हणाले होते अमित शहा?
एक नेता एका गरीब आई कलावतीच्या घरी जेवणासाठी गेला होता. इथे मागे बसून त्यांनी गरिबीचे तपशीलवार वर्णन केले. नंतर त्यांचे सरकार 6 वर्षे टिकले, मला विचारायचे आहे की त्या कलावतीचे काय झाले? कलावतींना घर, वीज, गॅस, शौचालय, धान्य, आरोग्य देण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. त्या आजही मोदींच्या सोबत आहेत. राहुल गांधी यांचे 13 वेळा लाँचिंग झाले आणि ते अयशस्वी ठरले अशी टीका देखील अमित शहांनी केली.
कोण आहेत कलावती?
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कलावती बांदूरकर कापूस वेचण्याचे काम करतात. 2005 मध्ये त्यांचे पती परशुराम बांदुरकर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना भेट दिली. त्यानंतर त्यांना मदतीचा ओघ देखील सुरू झाला. भारत जोडो यात्रेदरम्यान वाशीम येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती सोहळ्यात कलावती बांदूरकर यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन आभार मानले होते.