घरताज्या घडामोडीकळसूबाई शिखरावर ट्रेकिंग करण्यास बंदी, नियम मोडल्यास ५ हजाराचा दंड

कळसूबाई शिखरावर ट्रेकिंग करण्यास बंदी, नियम मोडल्यास ५ हजाराचा दंड

Subscribe

सर्वाधिक उंचीचे शिखर म्हणून ओळख असलेल्या कळसूबाई शिखरावर आणि पायथ्याच्या बारी गावात जाण्यास ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे. करोना विषाणूंचा जगभरात प्रादुर्भाव वाढत असताना नगर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालये बंद केली आहेत. त्यापाठोपाठ यात्रा, उत्सवांवरदेखील याचा परिणाम होऊ नये यासाठी हे कार्यक्रमदेखील रद्द केले जात आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्यास पाच हजाराचा दंड करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.

कळसूबाईचे शिखर नेहमीच पर्यटकांना खुणावत आले आहे. कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक, भाविक अकोले तालुक्यातील बारी गावामध्ये येत असतात. या पर्यटनावर परिसराचे अर्थकारण चालत असले तरी करोनाचा फटका आता पर्यटक आणि भाविकांनादेखील बसत आहे. कळसूबाई शिखरावर करोनाचे विषाणू पसरु नये, यासाठी खबरदारी म्हणून बारी ग्रामस्थांनी बाहेरच्या पर्यटकांना गावात येण्यास बंदी घातली आहे. तर विदेशी नागरिकांना गावापासून दहा किलोमीटर अंतरावरच रोखले जात असल्याची माहिती सरपंच तुकाराम खाडे यांनी दिली.

- Advertisement -

वनविभागाच्यावतीनेही वन अधिकारी पडवळ यांनी याला दुजोरा दिला. समुद्र सपाटीपासून सर्वाधिक उंचीवर असलेल्या या शिखरावर ट्रेकिंगची हौस भागविण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी आणि बारी गावाच्या वेशीवर बंदीचा फलक लावण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस आता कळसूबाई शिखरावर पर्यटक, भाविकांना जाता येणार नाही. दरम्यान या निर्णयामुळे बारी गावातील व्यावसायिक नाराज असून पर्यटक संघटनेनेदेखील याबद्दल चिंता व्यक्त केली.
दरम्यान अकोले तालुक्यातील पर्यटनस्थळी पर्यटकांनी पुढील काही दिवस गर्दी करु नये. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विविध आदेश पारित केले असून पर्यटकांनीदेखील याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -