घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकळसुबाई मंदिराला आकर्षक 'वारली' चित्रकलेची सजावट

कळसुबाई मंदिराला आकर्षक ‘वारली’ चित्रकलेची सजावट

Subscribe

अकोलेे : अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेली आई कळसुबाई मातेचे मंदिर अकोले तालुक्यातील बारी – जहागीरदारवाडी या गावांच्या सीमेवर बसलेली आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाणारे कळसुबाईचे शिखर नवरात्रीच्या उत्सवात भाविकांनी फुलून गेले आहे. चालू वर्षी बारी व जहागीरदारवाडी येथील कळसुबाई तरुण मित्र मंडळाने पुढाकार घेत मंदिराचे सुशोभीकरण केलेले आहे. आदिवासी अस्मितेचे प्रतीक मानली जाणारे वारली कला मंदिरावर रंगकाम करून साकारण्यात आलेली आहे. वारली कला चित्ररूपाने मंदिराच्या भिंतीवर अतिशय सुंदर पद्धतीने साकारण्यात आली आहे.

तालुक्यातील वारली कला साकारणारे चित्रकार रमेश साबळे यांनी हे रंगकाम कल्पक पद्धतीने केले आहे. गावातील तरुण मित्रांनी एकत्र येत मंदिराचे सुशोभीकरण व स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. गावातून वर्गणी गोळा करत या तरुण मित्रांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च स्थानी बसलेल्या कळसूबाईचे मंदिर सुंदर आणि स्वच्छ केले आहे. वारली चित्रांनी मंदिर सजले आहे. नवीन रूपातील मंदिर सर्व भाविकांना आकर्षित करत आहे. गावातील या तरुण मंडळाचे सर्वांनी कौतुक केले आहे. नवरात्रीनिमित्त नऊ दिवस या मंदिराला महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक भेट देत असतात. इथला निसर्ग हिरवाईने नटलेला असतो. अतिशय मोहक वातावरण व मधेच दाटून येणारे धूके असा निसर्गाचा वेगळा आविष्कार या ठिकाणी बघायला मिळतो. कळसुबाईच्या पर्वत रांगेत बसलेली बारी- जागीरदार वाडी ही टुमदार गावे व त्याच्या भोवतीची सुंदर हिरवीगार भात शेती सर्वांना आकर्षित करत असते. निसर्गमय वातावरण सगळ्यांनाच आकर्षित करत असते.चालू वर्षी गावातील तरुण मित्रांनी घेतलेला पुढाकार व भाविकांना आकर्षित करण्यासाठी मंदिराची केलेली साफसफाई व रंगरंगोटी भाविकांची मने जिंकून गेली हे मात्र नक्की. या कामासाठी कळसूबाई तरुण मित्र मंडळ जहागीरदारवाडी व बारी मंडळाने सहकार्य केले आहे.

- Advertisement -

यामध्ये मंडळातील हिरामण खाडे, पंढरीनाथ खाडे, विकास खाडे, अंकुश करटुले, भरत घारे, गुलाब करटुले, साहेबराव भारमल, रवींद्र खाडे, मच्छिंद्र खाडे, राजू खाडे दोन्ही गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य व तरुण मित्रांनी मदत व सहकार्य केले आहे. या तरुण मंडळाला ए. एस. के. फाउंडेशन मुंबई व बायफ या संस्थेचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -