घरठाणेकळव्यातील रेल्वेप्रवाशांची ट्रॅकवरुन पायी वारी, आंदोलनाचा उद्रेक कायम

कळव्यातील रेल्वेप्रवाशांची ट्रॅकवरुन पायी वारी, आंदोलनाचा उद्रेक कायम

Subscribe

कळवा: गेल्या पाच सहा दिवसांपासून सुरू असलेला कळव्यातील रेल्वे प्रवाशांचा तिढा अजूनही सुटला नसून तो आता पुन्हा एकदा आंदोलनाच्या उद्रेकापर्यंत पोहचला आहे. आता प्रवाशांचा प्रश्न राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आला असून तो सोडविण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. कळवा रेल्वे स्थानकात झालेल्या उद्रेकानंतर बदलापूर, ठाणे आणि मुंब्र्यातही तो प्रश्न धुमसू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी थेट विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न मांडला असून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल बदलापूर येथे झालेल्या रेल्वे आंदोलनाच्या विषयावर आंदोलन करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना ट्विटरवरून कळविल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून सकाळच्या वेळी कामावर जाताना धिमी गाड्यांची संख्या कमी होती. परंतु ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर कळव्यातील प्रवाशांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु या नव्या ट्रॅकवरून मेल एक्स्प्रेस सुरू करण्याची अपेक्षा असताना जुन्या ट्रॅकवरून सुरू केल्याने वादाला तोंड फुटले. त्यातच कळवा रेल्वे स्थानकात सकाळी प्रचंड गर्दी होत असल्याने रेल्वे डब्यात चढायलाही मिळत नसल्याने सर्वसामान्य प्रवाश्यांची मदार कारशेडमधून सकाळच्या वेळी सुटणाऱ्या चार गाड्यांवर होती. परंतु गेल्या चार दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने सध्या लोकल बंद करून अचानक या चार गाड्यांपैकी तीन गाड्या ऐसी स्वरूपाच्या सोडल्याने रोज सकाळी कामावर जाणाऱ्या हजारो प्रवाश्यांना या गाड्यांत चढतेवेळी कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कळव्यातील रेल्वे प्रवाशांच्या मनात उद्रेक निर्माण झाला आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर प्रवाशांचा हा प्रश्न गाजू लागल्याने मोठ्या आंदोलनाची तीव्रता निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने कळवा स्थानकात गेल्या तीन दिवसांपासून 50 रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना कारवाईसाठी धमकावले जात आहे. इतर प्रश्न महत्वाचे असताना कळवा स्थानकात बंदोबस्तासाठी पोलिसांचे छावणीचे स्वरूप निर्माण झाले आहे.

सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेचे तिकीट आणि पास काढल्यानंतर आज तरी बसून प्रवास करण्यासाठी कळवा कारशेडमधून गाडी मिळेल या आशेने येत आहेत. परंतु त्यांना गेले तीन दिवस कळवा ते ठाणे असा रेल्वे ट्रॅकवरून पायी वारी करावी लागतेय. ठाण्याला गाडी पकडून आपल्या कामाचे ठिकाण गाठावे लागत आहे. त्यामुळे या सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने कितीही दडशाही व पोलीस कारवाई केली तरी, न घाबरता येत्या रविवारी आम्ही मोठे आंदोलन छेडणारच असा इशारा कळवा पारसिक रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी दिला आहे. तर आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही कळव्यातील व मुंब्र्यातील प्रवाशांसाठी मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लाख रुपयांची मदत, सुधीर मुनगंटीवारांचा मोठा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -