कामाख्या देवी न्यायाचीही देवता, ४० आमदारांचा न्याय करेल; संजय राऊतांची टीका

महाराष्ट्र सरकार आणि आसामचं काय नातं निर्माण झालंय काय माहित. ते मुळचे काँग्रेसचेच. पण पक्षांतर करून ते मुख्यमंत्री बनले अशी टीका संजय राऊत यांनी आसामचे मुख्यमंत्री डॉ हिमंत विश्व शर्मा यांच्यावर केली.

sanjay raut

मुंबई – कामाख्या देवीची आख्यायिका आहे की ती न्यायाचीसुद्धा देवता आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्रावर अन्याय करून जे ४० लोक तेथे गेले आहेत, त्यांच्यावर कामाख्या देवी न्याय करेल, असा घणाघात संजय राऊतांनी केला. आज ते माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होतंय? संजय राऊतांचा उद्विग्न सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला गुवाहाटीला गेले आहेत. त्यावरून राज्यात राजकारण तापलं आहे. काही आमदार नाराज असल्याने ते गुवाहाटीला गेले नाहीत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनीही घणाघात केला. एवढंच नव्हे तर त्यांनी आसामचे मुख्यमंत्री डॉ हिमंत विश्व शर्मा यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्र सरकार आणि आसामचं काय नातं निर्माण झालंय काय माहित. ते मुळचे काँग्रेसचेच. पण पक्षांतर करून ते मुख्यमंत्री बनले अशी टीका संजय राऊत यांनी आसामचे मुख्यमंत्री डॉ हिमंत विश्व शर्मा यांच्यावर केली.

ते पुढे म्हणाले की, दोन पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचं नातं जुळलं असेल. नवी मुंबईत आसाम भवन आहे बहुतेक. मुंबईत आसाम आणि महाराष्ट्राची जनता गुण्यागोविंदाने राहते, असंही ते म्हणाले. कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ४० आमदारांना बोलावलं असा दावा करण्यात येतोय. पण आम्हाला कधी बोलावलं नाही. कारण आम्ही कधी पक्षांतर केलं नाही. कामाख्या देवीची आख्यायिका आहे ती न्यायाचीसुद्धा देवता आहे. ४० आमदारांवरही ती न्याय करेल, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – मुंबईच्या नेस्को मैदानात आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार, पक्षाला मिळणार नवी दिशा?

शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधातही संजय राऊतांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘संभाजीराजे छत्रपती असतील किंवा सातारचे उदयनराजे भोसले यांची भावना महाराष्ट्राची भावना आहे. शिवसेना किंवा मविआने सातत्याने याविरोधात आवाज उठवण्याचं काम केलं आहे. उद्धव ठाकरेंनी अल्टिमेटम दिला आहे. उद्धव ठाकरेंचं असंही म्हणणं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सातत्याने केला जातोय, कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्यावर हल्ले करतोय या सर्वांच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र यावं. यामध्ये संभाजी ब्रिगेड, संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले या सर्वांनी एकत्र यावं. ज्यांना ज्यांना महाराष्ट्र आणि शिवाजी महाराज यांच्यावर श्रद्धा आहे त्या सर्वांनी एकत्र यावं. या प्रत्येकाने एकत्र येऊन महाराष्ट्राचा इतिहास, शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांविरोधात कठोर निर्णय घ्यावा.’