नारायण राणे हाजिर हो, नितेश राणे प्रकरणात राणेंच्या बंगल्यावर चिकटवली पोलिसांनी नोटीस

शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्गमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. नॉट रिचेबल असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावलीय.

Union Minister Narayan Rane has been given Z level security by the Center Government

सिंधुदुर्गः सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नारायण राणेंनी काल पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला मूर्ख आहे का?, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरूनच कणकवली पोलिसांनी आता नारायण राणेंना नोटीस पाठवलीय. गेल्या काही दिवसांपासून कणकवली पोलीस नितेश राणेंचा शोध घेत आहेत. पण त्यांचा थांगपत्ता पोलिसांना अद्याप लागलेला नाही. तसेच नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. त्यावरूनच आता नारायण राणेंना पोलिसांनी कणकवली पोलीस स्टेशन हजर राहण्यास सांगितलेय.

शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्गमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. नॉट रिचेबल असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावलीय. आज दुपारी तीन वाजता कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहण्यात यावे, असे पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसीमध्ये म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर दिलं होतं. तसंच ते कुठे आहेत हे मला माहीत असेल तरी मी तुम्हाला का सांगावं? असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी पत्रकारांना उत्तर देताना केला होता. त्याच अनुषंगाने पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणात नितेश राणे यांच्याविरोधात अटकेचं वॉरंट निघालं आहे. नितेश राणे यांना अटक करावी, या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला विधानसभेत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. नितेश राणे सध्या नॉट रीचेबल आहेत.

राणेंनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी नोटीस बजावली असावी – गृहराज्यमंत्री

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी राणेंना पाठवलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे अधिकृत माहिती नाही, अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागेल. जर संबंधित तपास अधिकाऱ्यांनी नोटीस दिली असेल तर तपासाचा भाग असू शकतो. नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य सर्वांनीच ऐकलं आहे. मला माहिती असेल तरी नितेश राणे कुठे आहेत हे कशाला सांगू? असं नारायण राणे म्हणाले होते. त्याबाबत राणेंना नोटीस पाठवली असू शकते, असं शंभूराज देसाई म्हणाले.