Homeमहाराष्ट्रKarnak Pool : कर्नाक पुलावर पुढील महिन्यात बसणार दुसरा गर्डर; वाहतूक कधीपासून?...

Karnak Pool : कर्नाक पुलावर पुढील महिन्यात बसणार दुसरा गर्डर; वाहतूक कधीपासून? जाणून घ्या…

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) रेल्वे स्थानक आणि मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान असलेला कर्नाक पूल पाडून नव्याने उभारणी करण्याचे काम सध्या चालू आहे. या पुलाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर तो 5 जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) रेल्वे स्थानक आणि मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान असलेला कर्नाक पूल पाडून नव्याने उभारणी करण्याचे काम सध्या चालू आहे. या पुलाचा दुसरा गर्डर 19 जानेवारी 2025 रोजी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक 85 टक्के सुटे भाग कामाच्या ठिकाणी आणण्यात आले आहेत. यापूर्वी पहिला लोखंडी गर्डर 19-20 ऑक्टोबर 2024 रोजी बसविण्यात आला होता. मात्र आता पुलाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर हा पूल 5 जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मात्र तोपर्यंत स्थानिक नागरिकांना आणि वाहन चालकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Karnak Bridge to be open to traffic by 5 June 2025)

अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आज, गुरुवारी (12 डिसेंबर) कर्नाक पुलाच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली आणि पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी संबंधितांना आवश्‍यक ते निर्देश दिले. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) शहर राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यावेळी उपस्थित होते.

वास्तविक, रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिका प्रशासन यांनी संयुक्त पाहणी करून 154 वर्षे जुना कर्नाक पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने हा पूल पूर्णपणे पाडून त्या जागेवर पुन्हा नव्याने पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रेल्वे आणि महापालिकेने मिळून सदर पुलाचे पाडकाम 19 आणि 20 नोव्हेंबर 2022 रोजी मध्य रेल्वे मार्गावर सलग 27 तासांचा ब्लॉक घेऊन रोजी पूर्ण केले होते. मात्र त्यानंतर ह्या पुलाचे नव्याने उभारणी करण्याचे काम अपेक्षित जलदगतीने झाले नाही. त्यामुळे नवीन पूल उभारणी करण्यास विलंब होत आहे.

हेही वाचा – Eknath Shinde : महापालिकेतही महायुतीचाच वरचष्मा राहणार; काय म्हणाले उपमु्ख्यमंत्री शिंदे?

पहिला गर्डर 550 मेट्रिक टन वजन

रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन कर्नाक पूल उभारणीच्या कामाच्या अंतर्गत तब्बल 550 मेट्रिक टन वजन, 70 मीटर लांबी आणि 9.50 मीटर रुंदीचा पहिला लोखंडी गर्डर 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वे मार्गावर तीन तास ब्लॉक घेत बसविण्यात आला होता.

दुसरा गर्डर बसविणार

पहिला गर्डर यशस्वीपणे स्थापित करण्यात आल्यानंतर आता 19 जानेवारी 2025 रोजी बसवणार दुसरा गर्डर बसविण्याचे नियोजन रेल्वे आणि महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी आवश्यक 83 टक्के सुटे भाग पुलाच्या कामाच्या ठिकाणी आणण्यात आले आहेत. तर उर्वरित सुटे भाग 20 डिसेंबर 2024 पर्यंत प्रकल्‍पस्‍थळी दाखल होणे अपेक्षित आहे. या लोखंडी गर्डरच्या सुटया भागांचे जोडकाम, गर्डर स्थापित करण्याची कार्यवाही, पोहोचमार्ग (ॲप्रोच रोड) बांधणी, भार चाचणी (लोड टेस्‍ट) आदी कामकाजाचे सूक्ष्‍म नियोजन करत वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले आहे. त्‍यानुसार, अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्‍यास 5 जून 2025 पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्‍यासाठी महापालिका प्रयत्‍नशील आहे.
कर्नाक पुलाच्‍या दुसऱ्या बाजूच्‍या लोखंडी गर्डरचे 428 मेट्रिक टन (83 टक्‍के) सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळावर दाखल झाले आहेत. तर, उर्वरित सुटे भाग 20 डिसेंबर 2024 पर्यंत प्रकल्‍पस्‍थळी दाखल होणे अपेक्षित आहे. 13 जानेवारी 2025 पर्यंत गर्डरच्या सुट्या भागांचे जोडकाम करून 14 जानेवारी 2025 रोजी ‘ट्रायल रन’ केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी दिली.

कर्नाक पूल 5 जून 2025 पर्यंत वाहतुकीस खुला

दरम्यान, 18 आणि 19 जानेवारी 2025 रोजी रेल्‍वे ‘ब्लॉक’ मिळण्‍याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे विनंती करण्‍यात आली आहे. उपरोक्‍त कालावधीत रेल्वे ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर 19 जानेवारी 2025 पर्यंत तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल. त्या दृष्टीने मुंबई महापालिका प्रशासनाकडून मध्य रेल्वेसोबत समन्वय साधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, सदर रेल्‍वे मार्गावर गर्डर स्‍थापित करण्‍याची कार्यवाही पूर्ण झाल्‍यानंतर पुढील कामकाजाचे सूक्ष्‍म नियोजन करून टप्‍पेनिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार, पूर्व आणि पश्चिम दिशेच्‍या पोहोचमार्ग (ॲप्रोच रोड) साठी खांब बांधणीचा (पाईल फौंडेशन) पहिला टप्‍पा 15 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करणे, 17 एप्रिल 2025 पर्यंत खांब उभारणी पूर्ण करणे, 3 मे 2025 पर्यंत पोहोच रस्‍त्‍यांचे काँक्रिटीकरण आणि 1 जून 2025 रोजी भार चाचणी (लोड टेस्‍ट) करण्‍याचे नियोजन आहे. या नियोजित वेळापत्रकानुसार, अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्‍यास 5 जून 2025 पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्‍यासाठी महापालिका प्रयत्‍नशील आहे, असे अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी सांगितले

हेही वाचा – NIA Raid In Maharashtra: अमरावती, भिवंडी आणि संभाजीनगरात एनआयएचे छापे; तिघांना घेतले ताब्यात

कर्नाक पूलाबाबत माहिती

  1. पूल निर्मिती – 1866-67
  2. जड वाहतुकीसाठी पुलाचा वापर बंद – ऑगस्ट 2014
  3. पूल पाडणे – 19 आणि 20 नोव्हेंबर 2022
  4. पुनर्बांधणी – 5 जून 2025 पर्यंत पूल होणार वाहतुकीस खुला
  5. पाडकामाचा खर्च – सुमारे 2 कोटी

Edited By Rohit Patil