कर्नाळा अभयारण्याचा लवकरच होणार विकास, आराखडा सादर करण्याचे आदेश

कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील पर्यटन सुविधांच्या बळकटीकरणासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर कारावा, असे आदेश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एल.पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिम गुप्ता, सहसचिव भानुदास पिंगळे, उपवनसंरक्षक सरोज गवस आदी उपस्थित होते.

अभयारण्यातील पक्ष्यांच्या अधिवास संवर्धनाला प्राधान्य देत परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे सूचित करुन कर्नाळा परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी अलिबाग येथील वन विभागाची मान्यता घेवून स्थलांतर करावे. कोणत्याही परवानग्या, मान्यता वन विभागाकडून प्रलंबित राहता कामा नये. कर्नाळा किल्ल्याची डागडुजी, दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

श्रीमती गवस यांनी यावेळी सादरीकरण केले. आराखड्यामध्ये ॲडव्हेंचर पार्क, मुलांची खेळाची जागा, धबधबे, पुलांची दुरूस्ती, पाथवे, बचत गटांचे कॅन्टीन, प्रवेशद्वारावर आणि परिसरात सीसीटीव्ही, विद्युतीकरण, पक्षी निरीक्षण पॉईंट आदींचा समावेश आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलपासून १२ कि.मी. तर मुंबईपासून ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे मुंबईसह आसपासचे हजारो पर्यटक भेट देत असतात. कर्नाळा पक्षी अभयारण्यातील कर्नाळा किल्ला हा पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. १२.१०९४ चौ.कि.मी. क्षेत्राच्या अभयारण्यामध्ये पक्षांच्या १४७ प्रकारच्या जाती आहेत. हिवाळ्यात ३७ स्थलांतरीत पक्षी येथे पाहायला मिळतात. विविध प्रकारच्या ६४२ वृक्षप्रजाती येथे आहेत. ११ प्रकारचे सस्तन प्राणी, २३ प्रकारचे सर्प, ५ प्रकारचे सरडे आणि बेडूक, १० प्रकारचे कोळी आणि फुलपाखरांच्या ५६ प्रजातीही येथे अस्तित्वात आहेत. या सर्वांचे जतन करून निसर्ग पर्यटन आराखडा अंतिम करावा.

कांदळवन उद्यानाचा रस्ता सहा महिन्यात करावा

कांदळवनाची उपयुक्तता सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी त्यासोबतचं कांदळवनाचा अनुभव घेता यावा यासाठी दहिसर येथील कांदळवन परिसरात ‘कांदळवन उद्यान’ उभे राहणार आहे. या उद्यानाला सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाली असून उद्यानाला पोहोचणारा रस्ता सहा महिन्यात करण्याच्या सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

मानवी जीवनासाठी आणि नैसर्गिक जैवविविधता टिकून राहण्यासाठी कांदळवनाचे महत्व आहे. कांदळवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याची शास्त्रीय माहिती जनतेला होण्यासाठी आणि त्यांच्या मनात कांदळवन परिसंस्थेबाबत आपुलकी निर्माण करण्यासाठी मुंबईत कांदळवन उद्यान उभे राहत आहे. दहिसर आणि गोराई येथे हे उद्यान उभे राहणार आहे. त्यातील गोराई कांदळवन उद्यानाचे काम सुरू झाले आहे. दहिसर येथील कांदळवनला पोहोचणारा रस्ता तयार करण्यासाठी मुंबई महापालिकेने त्वरित आराखडा तयार करावा. नियमानुसार त्याबाबतची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या.


हेही वाचा : ठाकरेंनी बॅग भरावी आणि निघावं, ‘ते’ दोन मंत्री आहेत उचलायला.., नितेश राणेंची खोचक टीका