लोकशाहीवर भाषण देणाऱ्या ‘त्या’ मुलाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री शिंदे सरसावले, दिला ‘हा’ आदेश

अखेर या मुलाच्या मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले.मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्वीट करत याची माहिती दिली आहे.

Eknath Shinde-Meet-With-Kartik-Vajir
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिकची भेट घेतल्यानंतर एक आदेशही दिलाय.

तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर मोबाईल स्क्रीन स्क्रोल करता करता एका गोऱ्या मुलाचं लोकशाहीवरील भन्नाट भाषणाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेलच. या मुलाच्या खोडकर भाषणाने तो रातोरात सोशल मीडियावरील स्टार बनला. प्रत्येक जण या मुलाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक होता. हा व्हिडीओ जसा सोशल मीडियावर व्हायरल झाला तशी त्याच्या संघर्षाची कहाणी सुद्धा प्रसिद्धी झोतात आली. या मुलाला रातांधळेपणाचा आजार असून त्याची घरची परिस्थिती हालाखीची असल्याचं समजताच लोक त्याच्यासाठी हळवे होऊ लागले. अखेर या मुलाच्या मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या रेवलगाव या साडेसहाशे लोक वस्ती असलेल्या गावातील हा चिमुकला आहे. कार्तिक जालिंदर वजीर असं या चिमुकल्याचं नाव आहे. कार्तिकला रातांधळेपणाचा आजार असल्याचं कळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिक वजीरची दखल घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी या भोऱ्या कार्तिकची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्वीट करत याची माहिती दिली आहे. याप्रसंगी कार्तिक याच्या लोकशाही विषयावरील भाषणाकरिता अभिनंदन करीत त्याचे मनापासून कौतुक केले,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिकची भेट घेतल्यानंतर एक आदेशही दिलाय. “भेटीमध्ये कार्तिकला दूरदृष्टीचा दोष आहे असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्याच्या डोळ्यांवरील उपचाराची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत घेण्यात आल्याचे यासमयी जाहीर केले,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.

तसंच लवकरात लवकर चिरंजीव कार्तिक याला ज्येष्ठ नेत्र चिकित्सक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्याकडे नेत्र तपासणीसाठी मुंबईत आणण्यात येणार असून त्याच्यावर मुंबईतील सर्वोत्तम रुग्णालयामध्ये उत्तमोत्तम उपचार करण्यात येणार आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.