करून दाखवलं! तुफान पावसातही हिंदमाता भरलं नाही, आदित्य ठाकरेंचे ट्विट

यंदा सतत दोन दिवस पाऊस पडल्यानंतरही येथे पाणी न साचल्याने नागरिकांना सुखद धक्का बसला आहे. यावरून राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट केलं आहे. करून दाखवलं असं म्हणत त्यांनी ट्विट केलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तुफान पाऊस कोसळत असतानाही दादरमधील हिंदमाता (Hindmata) येथे पाणी साचलं नाही. टीचभर पावसातही हिंदमाता परिसरात पाणी साचतं. मात्र, यंदा सतत दोन दिवस पाऊस पडल्यानंतरही येथे पाणी न साचल्याने नागरिकांना सुखद धक्का बसला आहे. यावरून राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट केलं आहे. करून दाखवलं असं म्हणत त्यांनी ट्विट केलं आहे. (Karun Dakhavala Hindmata is not flooded even in heavy rains, Aditya Thackeray’s Tweet)

हेही वाचा – हिंदमाता, मिलन सब वेमध्ये यंदा तुंबणार नाही; आदित्य ठाकरेंचा दावा

हिंदमाताच्या भौगोलिक रचनेमुळे या परिसरात नेहमी पाणी साचतं. हा भाग सखल असल्याने थोड्याश्या पावसामुळेही येथे पाणी भरतं, परिणामी वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत होतं. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्षाकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, दरवर्षी त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरायचं. मात्र, यावेळेस महापालिकेने हिंदमाता येथील पावसाचे पाणी साठविण्यासाठी सेंट झेविअर्स मैदानात भूमिगत जलधारण टाक्या बांधण्यात आल्या. या टाक्यांची क्षमता 2.87 कोटी लिटर इतकी असून पपिंग स्टेशन आणि भूमिगत पाण्याच्या टाकीमुळे पाण्याचा निचरा लवकर होईल, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार दोन दिवस तुफान पाऊस होऊनही हिंदमाता परिसरात पाणी न साचल्याने पालिकेचा हा प्रयत्न सफल झाल्याचं स्पष्ट होत आहे. मुंबई महापालिकेकडूनही येथील एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता.


यंदा हिंदमाता परिसरात पाणी साचणार नाही, असा दावा दरवर्षी केला जायचा. मात्र, दरवर्षी हा दावा फोल ठरत असे. मात्र, यंदा परिसरात पाणी साचलं नाही, त्यामुळे करून दाखवलं असं म्हणत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, हाच प्रयोग गांधी मार्केट परिसरातही करण्यात आला असून यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी गांधी मार्केट येथील एक व्हिडिओ पोस्ट करत दशकभरात पहिल्यांदाच येथे विनाव्यत्यय रहदारी सुरू आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा – हिंदमाता पुरमुक्त होणार! पर्जन्य जलवाहिन्या, नाले कामांवर ६० कोटींचा वाढीव खर्च

गांधी मार्केट परिसरातील रहदारीचा व्हिडिओ मुंबई पालिकेच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. या ट्विटचे रिट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले की, गांधी मार्केट आणि हिंदमातावर काम करू लागलो आहोत. कालच्या मुसळधार पावसाने हे दाखवून दिले आहे की गेल्या दशकभरात पहिल्यांदाच दोन्ही ठिकाणी विनाव्यत्यय रहदारी होती. आम्ही बनवलेल्या पंप आणि अंडरग्राउंड रेन होल्डिंग टाक्यांमुळे हे शक्य झालं आहे. तसेच, मिलन सबवे येथील टाकी पुढील वर्षी तयार होईल.