करुणा शर्मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, मागील काळातील दाखल खटल्यांप्रकरणी चर्चेची शक्यता

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा विधानभवनात दाखल झाल्या आहेत. करूणा शर्मा एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचल्या असून मागील काळातील दाखल खटल्यांप्रकरणी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकी भेट कशासाठी?

महाविकास आघाडीचं सरकार असताना करूणा शर्मा यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यालयाच्या वतीने त्यांना वेळ देण्यात आली आहेत. त्यामुळे शर्मा या काही वेळेनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीदरम्यान नेमकं करूणा शर्मा काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी करूणा या शब्दाचा उल्लेख करताच विधानसभेत एकच हशा पिकला. काही लोक बाहेर फक्त एकच शब्द म्हणतात. ताट वाटी चलो गुवाहाटी. धनंजय मुंडे एवढ्या घोषणा देत होते, जसे काय ते जुने शिवसैनिक आहेत. ते असे बोलत होते बेंबीच्या देटापासून ओरडून. घसा खराब होईपर्यंत ते बोलत होते. तुमचा सगळा प्रवास मला माहित आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रेम, दया करुणा दाखवली. त्यावेळी निभावली, पण परत-परत दाखवता येणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.

कोण आहेत करूणा शर्मा?

1) करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडे हे आपल्या मुलांचे वडील असल्याचा दावा केला होता.

2)  गेल्या अनेक वर्षांपासून मुंडेंसोबत राहत असल्याचा दावाही करूणा शर्मा यांनी केला होता.

3) करूणा शर्मा यांचे मुंडेंसोबतचे फोटो देखील व्हायरल झाले होते.

4) मुंडेंनी एक फेसबुक पोस्ट लिहून आपल्या संबंधांची कबुली दिली होती.


हेही वाचा : विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतल्याचा अजित पवारांना संशय