कसबा पेठ, चिंचवडसाठी आज मतमोजणी; मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने?

voting counting
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे – सत्ताधारी शिवसेना-भाजप युती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा पेठ तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आज गुरुवारी, सकाळी नऊ वाल्यापासून मतमोजणी सुरू होईल. युती आणि महविकास आघाडीने आपली राजकीय ताकद पणाला लावून ही पोटनिवडणूक लढविली आहे. त्यामुळे या लढाईत कोण बाजी मारणार याबाबतची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत निम्म्या मतदारांनी घरी राहणे पसंत केले. त्यामुळे कसब्यात अवघे 41.1 टक्के आणि चिंचवडमध्ये 45.25 टक्के मतदान झाले. पोटनिवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने निकालाविषयी उत्सुकता आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत.

कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत आहे, तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे. 8 महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच युती आणि महाविकास आघाडी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदानाला अल्प प्रतिसाद

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानात पुणेकरांचा निरूत्साह दिसून आला. कसबा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 45.25 टक्के, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात 41.1 टक्के मतदान झाले. कसबा पेठमध्ये एकूण 16 उमेदवार रिंगणात असून 2019 मध्ये ५१.५४ टक्के मतदान झाले होते, तर चिंचवडमध्ये एकूण 28 उमेदवार रिंगणात असून 2019 मध्ये येथे 53.59 टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी लागणार आहे.

या दोन्ही मतदारसंघांतील मतदारांनी सकाळी मतदानासाठी गर्दी केली होती, मात्र दुपारनंतर मतदान संथ गतीने सुरू होते. चिंचवडमध्ये सकाळी 7 ते 9 या वेळेत 3.52 टक्के, 9 ते 11 या वेळेत 10.45 टक्के, 11 ते 1 या वेळेत 20.68, तर 1 ते 3 या वेळेत 30.55 टक्के मतदान झाले. कसबा पेठ मतदारसंघात सकाळी 7 ते 9 या वेळेत 6.5 टक्के, 9 ते 11 या वेळेत 8.25 टक्के, 11 ते 1 या वेळेत 18.50, तर 1 ते 3 या वेळेत 30.05 टक्के मतदान झाले.