घरमहाराष्ट्रपुणे'...आता नंबर बापटांचा...' पासून 'धंगेकर इज नाऊ MLA', पुण्यातील बॅनरबाजीने गाजली कसबा...

‘…आता नंबर बापटांचा…’ पासून ‘धंगेकर इज नाऊ MLA’, पुण्यातील बॅनरबाजीने गाजली कसबा पोटनिवडणूक

Subscribe

पुणेरी पाट्यांना अगदी तगडी टक्कर देणारे पुणेरी बॅनर्स फार चर्चेत आले. चला एक नजर टाकुयात पुणेरी पाट्यांना टक्कर देणारे निवडणूकीतले पुणेरी बॅनर्स....

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मानाच्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि चिंचवडमधून भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय झाल्या. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी विजयाचे बॅनर्स झळकू लागले आहेत. पण या निवडणूकीच्या प्रचाराचा संपूर्ण काळ आठवला की आठवतात ते पुणेरी बॅनर्स…आजपर्यंत तुम्ही पुणेरी पाट्यांबद्दल अनेक चर्चा ऐकल्या असतील. पण याच पुणेरी पाट्यांना अगदी तगडी टक्कर देणारे पुणेरी बॅनर्स फार चर्चेत आले. चला एक नजर टाकूया पुणेरी पाट्यांना टक्कर देणारे निवडणुकीतले पुणेरी बॅनर्स….

..आता नंबर बापटांचा का?

पुण्यात कसबा मतदार संघातून ब्राम्हण समाजाला उमेदवारी नाकरल्याने पुण्यात पोस्टर वॉर सुरू झाले. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी नाकारत ब्राह्मणेतर उमेदवार दिल्याने ब्राम्हण वर्गात काहीशी नाराजी होती. त्यावेळी काही आज्ञातांनी शहरात तब्बल २४ ठिकाणी बॅनर्स लावले होते.

- Advertisement -

‘आधी कुलकर्णी यांचा मतदार संघ गेला, नंतर टिळकांचा गेला, तर आता नंबर बापटांचा का ? असा सवाल करत हा अन्याय समाज कूठपर्यंत सहन करणार? असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला. पिंपरी चिंचवड मतदार संघात लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. मग हा न्याय ‘कसब्या’साठी का नाही असा सवालही त्यावेळी लोकांच्या मनात उपस्थित झाला.

पुण्यातील पत्रकार भवन, गांजवे चौक, दांडेकर पूल, मांगिरबाबा चौक, दत्तवाडी, अलका चौक, साहित्य परिषद, स प महाविद्यालय, महाराणा प्रताप उद्यान, विजय टॉकीज, मामलेदार कचेरी, लाल महल, फडके हौद, पवळे चौक, सोन्या मारुती चौक, लोहीया नगर, शनिवार पेठ, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग चौक, चित्रशाळा चौक शनिवार वाडा, बालगंधर्व चौक, कुंभारवाडा, जूना बाजार, टिळक स्मारक मंदीर आदी चौकात हे फलक लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

Puneri-Banner-Kasba-By-Poll

 

आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा, आम्ही दाबणार NOTA

अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर पुणे कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट झालं होतं. कसबा पेठेत टिळक परिवाराला उमेदवारी दिली नाही, यावरुन बॅनर लागले होते. कसबा पेठ मतदार संघातून भाजपने हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर केली आणि भाजपच्या या बालेकिल्ल्यात पोस्टर झळकले. पुण्यातील मोदी गणपतीजवळ अज्ञातांकडून बॅनर लावण्यात आले होते. आमचं ही ठरलं
धडा कसा शिकवायचा
कसबा हा गाडगीळांचा
कसबा हा बापटांचा
कसबा टिळकांचा
का काढला आमच्याकडून कसबा
आम्ही दाबणार NOTA

असं या बॅनरवर लिहिण्यात आलं होतं. या बॅनर्सवर लिहिणाऱ्याचं नाव ‘कसब्यातील एक जागरूक मतदार’ असं देण्यात आलं होतं. हे बॅनर्स आणि त्यावर मांडण्यात आलेला मुद्दा यामुळे पुण्यात पोटनिवडणुकांवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती.

Puneri-Banner-Kasba-By-Poll-2

 

नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी…

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमधून महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, बंडखोरी करत शिवसेनेचे नेते असलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणूनअर्ज दखल केला. त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने चिंचवड पोटनिवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. त्यावेळी राहूल कलाटे संदर्भात बॅनर्स शहरात झळकले. एका शिवसैनिकाने राहुल कलाटे यांना विरोध दर्शवण्यासाठी चिंचवड येथील चाफेकर चौकात बॅनर लावण्यात आले होते.

“एका अपक्षची उमेदवारी खोक्यातून… नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दरी, एकदम ओक्के डोक्यातून… खरा शिवसैनिक”, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं होतं. या बॅनरची देखील प्रचंड चर्चा त्यावेळी रंगली होती.

Puneri-Banner-Kasba-By-Poll-3

 

“जिथे गरज तिथे धीरज..”

एकीकडे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू होती. तर दुसरीकडे अनेक प्रभागात येत्या महापालिका निवडणूकीसाठीची तयारी देखील सुरू होती. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचा रणसंग्राम सुरू असताना आणखी एक बॅनर प्रचंड चर्चेत आला होता. अनेक नगरसेवकांनी आपण केलेल्या कामांची माहिती बॅनर्समधून दिली आहे.

राज्यातील काही महापालिकांच्या निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय टीका, आरोप-प्रत्यारोपही रंगू लागले आहेत. यामध्ये पुणेकरांनी आघाडी घेतली आहे. पुण्यात सध्या महापालिका निवडणुकीची सुरू झाली आहे. सध्या प्रभाग आराखडा प्रसिद्ध झाला आहे. यानंतर इच्छुक उमेदवारांनी आणि काही नगरसेवकांनी आतापासूनच बॅनरबाजीला सुरूवात केली आहे. सानेगुरुजी नगर इथले नगरसेवक धीरज घाटे यांचा हा बॅनर होता. जिथे गरज तिथे धीरज अशा आशयाचे बॅनर त्यांनी आपल्या प्रभागात लावले होते. नागरिकांनी कोणत्याही अडचणीत काही मदत हवी असेल तर त्यांनी काही मोबाईल नंबर दिले होते आणि त्यावर मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या याच बॅनरला उत्तर देणारे आणखे दुसरे बॅनर देखील झळकले.

 

“नको बापट, नको टिळक…”

त्याखाली “धीरज आम्हाला नाही तुझी गरज, आता घरी जा परत” अशा आशयाचा एक बॅनर त्याच खाली लावण्यात आला होता. तर “नको बापट, नको टिळक, पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख” अशा आशयाचा दुसरा बॅनरही तिथे लावण्यात आला होता. पण हे बॅनर कुणी लावले होते ते कळू शकलेले नाही. या बॅनरची चर्चा शहरात सुरु झाली होती. अनेकांनी ह्या बॅनरचा फोटो ट्विटदेखील केला होता.

Puneri-Banner-Kasba-By-Poll-4

 

“यंदा कसब्यात धंगेकरच”

कसबा पोटनिवडणुकीमुळं पुण्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. भाजपचा बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपचे बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे पहायला मिळालं. कसब्यात रासने विरुद्ध धंगेकर अशी लढत जरी असली तरी खरी लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी होत असल्याने सर्वांचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागलं होतं. प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना कसब्यात लावण्यात आलेल्या लहान फलकांची सध्या जोरदार चर्चा रंगली. मध्यरात्री कसब्यातील वाडे, सोसायटी तसेच मोकळ्या जागेवर लहान लहान फलक लावण्यात आले होते. यावर “इथे सोने, चांदी, पैसे इ. सर्वकाही स्वीकारले जाईल. टीप-मत मात्र रवी धंगेकरलाच दिले जाईल. “यंदा कसब्यात धंगेकरच” तसंच ‘कोणी कितीही म्हटलं, ‘तुमचं काम मार्गी लावतो’ पण सर्वांना माहितीये वेळेला फक्त रवीभाऊच धावतो! त्यामुळे आम्हाला कुठलीही आमिषं दाखवू नयेत.” अशा आशयाचे बॅनर होते.

Puneri-Banner-Kasba-By-Poll-6

 

“..तर सर्व मते धंगेकरांना मिळणार असल्याचे समजावे’

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या समर्थनार्थ कसब्यातील अनेक घरांच्या गेटवर लागलेल्या पुणेरी पाट्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती. ‘यंदा कसब्यात धंगेकरच’ असा हॅशटॅग वापरून कसब्यातील अनेक ठिकाणी पुणेरी पाट्या झळकल्या. कसब्यातील एका घरावर ‘बेल वाजवूनही दार उघडले नाही तर घरातील सर्व मते धंगेकरांना मिळणार असल्याचे समजावे’, असं सांगण्यात आलं. धंगेकर समर्थकांनी भाजपच्या लोकांनी प्रचारासाठी घरात येऊ नये, यासाठी वेगळीच क्लुप्ती लढवली होती.

‘सदाशिव, नारायण आणि शनिवार पेठा…”

याशिवाय दुसऱ्या एका पुणेरी पाटीत ‘सदाशिव, नारायण आणि शनिवार पेठा या धंगेकरांसोबत आहेत, काळजी नसावी’, असं सांगण्यात आलं. पेठांच्या भागांमध्ये दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार करायला सुरुवात केल्यानंतर आता या पुणेरी पाटीचीही चांगलीच चर्चा रंगली. पोटनिवडणुकीत धंगेकरांच्या समर्थनार्थ पुणेरी पाट्या लागल्यामुळं कसब्यात मविआच्या बाजूनं वातावरणनिर्मिती झाली होती.

Puneri-Banner-Kasba-By-Poll-5

“who is धंगेकर…? धंगेकर ईज नाऊ MLA”

त्यानंतर आज या पोटनिवडणूकीचा निकाल लागल्यानंतर कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे नवे बॅनर सध्या झळकू लागले आहेत. कसबा मतदार संघात 11 हजार मतांनी कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर विजयी झाले. आता ‘कसबा तो झाकी है कोथरुड अभी बाकी हे’ या मजकूराचे बॅनर्स लावण्यात आले आहे. त्यासोबतच who is धंगेकर…? धंगेकर ईज नाऊ MLA ही कविता चर्चेचा विषय ठरली आहे.

Puneri-Banner-Kasba-By-Poll-7

चंद्रकांत पाटलांनी प्रचार सभेत रविंद्र धंगेकरांना चांगलंच डिवचलं होतं. भरसभेत “हू ईज धंगेकर. तो आमच्यासमोर टिकू शकत नाही”, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर धंगेकरांचे समर्थक पेटून उटले होते. त्यांनी सगळ्या कसब्यात पुणेरी पाट्या लावल्या होत्या. आज विजयानंतर त्यांनी चंद्रकात पाटलांना चांगलंच उत्तर दिलं. “धंगेकर नाऊ.. MLA” असं या बॅनरवर लिहिण्यात आलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -