घरताज्या घडामोडीकसब्यात टिळक कुटुंबाबाहेरची उमेदवारी भोवणार?

कसब्यात टिळक कुटुंबाबाहेरची उमेदवारी भोवणार?

Subscribe

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात टिळक कुटुंबाबाहेरचा उमेदवार दिल्याने भाजप नव्याच चक्रव्यूहात सापडली आहे. येथे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला पक्षाने तिकीट नाकारून त्यांच्याऐवजी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय हेमंत रासने यांना तिकीट दिल्याने कसब्यातील ब्राम्हण समाज दुखावला गेला आहे.

पुणे : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात टिळक कुटुंबाबाहेरचा उमेदवार दिल्याने भाजप नव्याच चक्रव्यूहात सापडली आहे. येथे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला पक्षाने तिकीट नाकारून त्यांच्याऐवजी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय हेमंत रासने यांना तिकीट दिल्याने कसब्यातील ब्राम्हण समाज दुखावला गेला आहे. कसबा पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ या मध्य भागांमध्ये अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या फलकांतून हे नाराजीचे सूर स्पष्टपणे उमटले आहेत, तर दुसरीकडे चिंचवडमधून मात्र दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी आणि पर्यायी उमेदवार म्हणून त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे टिळक कुटुंबाबाहेरची उमेदवारी भाजपच्या अंगलट येऊ शकते की काय, अशी चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे, तर जगताप कुटुंबातील दोघांपैकी कोण अर्ज मागे घेणार, हा प्रश्नही अद्याप अनुत्तरितच आहे. पुण्यातील या गोंधळाला चंद्रकांत पाटील यांचा हस्तक्षेप जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.

मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी भाजपकडून अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना टिळक कुटुंबातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक हे दोघेही अनुपस्थित होते. शैलेश टिळक यांनी काही माध्यमांशी बोलताना आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखविली होती. एकीकडे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली, पण कसब्यामध्ये टिळक कुटुंबातील शैलेश टिळक किंवा कुणाल टिळक या दोघांनाही उमेदवारी देण्यात आली नाही. 4 दिवसांपूर्वीच पक्षाने कुणाल टिळक यांची प्रवक्तेपदी नेमणूक केली होती. त्यावेळीच टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली जाणार नाही, अशी चर्चा पुण्यात सुरू झाली होती आणि अखेर ती खरी ठरली.

- Advertisement -

फेब्रुवारी २०२२ मध्ये संपलेल्या पुणे महापालिकेच्या कार्यकाळात सलग चार वेळा हेमंत रासने यांना भाजपने स्थायी समितीचे अध्यक्ष केले होते. एकाच नेत्याला सलग चार वेळा इतक्या मोठ्या महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद देणे हे दुर्मीळ समजले जाते. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही पक्षाने एकाच नेत्याला सलग चार वेळा महापालिकेतील महत्त्वाचे पद कसे दिले, असे प्रश्न याआधीही राजकीय वर्तुळात विचारण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा हेमंत रासने यांनाच पक्षाने विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याशी असलेल्या जवळकीमुळेच हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे.

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, पण अलीकडे या मतदारसंघातील जातीय समीकरणे बदलत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याचीही चर्चा पुढे येत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये सलग पाच वेळा पुण्याचे सध्याचे खासदार गिरीश बापट यांनी नेतृत्व केले होते. त्याआधी १९७८ आणि ८० या दोन्ही निवडणुकांमध्ये अरविंद लेले याच मतदारसंघातून निवडून आले होते. १९९० च्या निवडणुकीत अण्णा जोशी याच मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुक्ता टिळक या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. कसबा विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून ब्राम्हण समाजाकडेच आहे. आता या निवडणुकीत भाजपश्रेष्ठींनी नवी खेळी खेळल्याचे दिसत आहे. त्याबद्दलही राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे.

कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध केल्यास मी उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार आणि नाना पटोले यांचे आभार मानेन, परंतु त्यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यास नकार दिला. जर त्यांनी पोटनिवडणूक बिनविरोध केली तर आम्ही टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देण्यास तयार आहोत.

-चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -