मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी गणेशोत्सवाआधी वाहतूक बंद करण्यात आली होती. यानंतर आता कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. तसेच मुंबईहून गोव्याकडे आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Kashedi tunnel on Mumbai-Goa highway closed for traffic for 15 days)
गेली अनेक वर्षे डागडुजी न केल्याने सद्यस्थितीत घाट रस्त्यावरून वाहतूक करणे जिकिरीचे बनले आहे. अनेक ठिकाणी खड्डे आणि काही ठिकाणी रस्त्यालगत असलेली गटारे नादुरुस्त आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास घाट रस्त्याने प्रवास करणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्याची निर्मिती करण्यात आली आहे. या बोगद्यामुले पोलादपूर ते खेड हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. परंतु बोगद्यातून वाहतूक सुरू केल्यानंतर अनेक वेळा काही कारणास्तव हा बोगदा नेहमीच बंद करण्यात येतो. त्यामुळे वाहन चालकांना नेहमी कशेडी घाटाचा पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतो. याचपार्श्वभूमीवर कशेडी घाटातील या बोगद्याचे काम लवकरच पूर्ण व्हावे, अशी मागणी वाहन चालकांमधून होतना दिसते.
हेही वाचा – Supreme Court : राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष-समाजवाद शब्द काढून टाकण्याची मागणी; न्यायालयाने याचिका फेटाळली
कशेडी घाटात बोगदा मार्गावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन व एल अँड टी कंपनीकडून नवीन मार्गावरील वाहतूक शनिवारी (23 नोव्हेंबर) दुपारी अडीचपासून बंद करण्यात आली आहे. तसेच जुन्या मार्गावरून वाहतूक कशेडी बंगलामार्गे सुरळीत सुरू राहणार आहे. याबाबत माहिती देताना राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले की, कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू आहे. हे काम करत असताना येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ नये, त्यामुळे बोगद्यातून जाणारी वाहतूक पुढील पंधरा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : निवडणूक कोणतीही असो… वाढला उमेदवारांवरील विश्वास, ‘नोटा’चा टक्का घटला