घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रडोंगर्‍यादेवांच्या "भूर्रर्रने" दणाणला कसमादे, पेठ, सुरगाणा, दिंडोरी पट्टा

डोंगर्‍यादेवांच्या “भूर्रर्रने” दणाणला कसमादे, पेठ, सुरगाणा, दिंडोरी पट्टा

Subscribe

प्रमोद उगले । नाशिक

पारंपरिक आदिवासी लोकगिते, लोकांच्या हातात असलेली वंशपरंपरागत मिळालेली वाद्य घुंगरू काठीबांबूचा खराटा, पावरी वाद्य, कातडी हलगी, डमरू, चिमटा आणि त्याला टाळ्यांची साथ अन् तोंडातून भूर्रर्र..! आवाज. कसमादे परिसरासह नाशिक, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात घुमू लागला आहे. डोंगर्‍यादेव उत्सव हा साधारणत: मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला सुरू होवून मार्गशीर्ष पौर्णिमेला याची सांगता होते. आदिवासींच्या विविध जमातींपैकी प्रामुख्याने कोकणा, महादेवकोळी, भिल्ल, वारली, आदी जमातीचे लोक मोठ्या प्रमाणावर डोंगर्‍यादेवांचे व्रत करतात.

- Advertisement -

डोंगर्‍या देव म्हणजेच कार्तिकस्वामी. आदिवासी बांधवांची निसर्गावर अपार श्रद्धा असल्याने डोंगर्‍यादेव उत्सवाच्या काळात जंगलातील पशूपक्षी, वाघ देव, नागदेव, मोर, चंद्र-सूर्य यांना ते आपले दैवत मानून त्यांची पूजा करतात. त्याशिवाय डोंगराच्या पायथ्याला असलेल्या हिरवा, कंसरामाता, लक्ष्मी, रानवा आदी देवतांची अखंड दीप लावून सलग पंधरा दिवस पूजा केली जाते. डोंगर्‍यादेव हे आदिवासींचे अतिशय खडतर आणि महत्वाचे व्रत मानले जातात. सालाबादाप्रमाणे यावर्षीही सर्वत्र डोंगर्‍यादेव व्रताच्या कार्यक्रमास नुकतीच सुरुवात झाली आहे. दिवसभर अनवाणी पायाने गावोगावी फिरत भिक्षा एकत्र करून सायंकाळी तळावर या माउल्या एकत्र येतात. मिळालेल्या भिक्षेतून व्रत सोडतात. आदिवासी आम्ही डोंगरवासी, चंद्र-सूर्यापासून आदिवासी, डोंगर्‍यादेवाला नवस करू, ढोल्या उंबरणा फूल तोडू दे यांसारखी विविध गीतं पावरीच्या तालावर गावून रात्रभर जागरण करत पारंपरिक नृत्य करतात.

उत्सवाच्या समाप्तीच्या दिवशी सर्व माऊल्या गावाजवळील डोंगरावर गड जिंकण्यासाठी जातात. त्या ठिकाणी डोंगराची म्हणजेच डोंगर्‍या देवाची विधिवत पूजा केली जाते. शेतात काम करताना निसर्गाचा कोप होऊ नये, शेतात पेरलेले पीक चांगले यावे. घर संसाराची भरभराट व्हावी असे आशीर्वाद या माउली निसर्गाकडून मागतात. सांगतेच्या वेळी कोंबड्याचा किंवा बोकडाचा बळी दिला जातो.

- Advertisement -
आदिवासी समाजाच्या डोंगर्‍या देव उत्सवाची काही प्रमुख ठिकाणे

कंसर्‍या गड-शबरीधाम डांग, शेंदवड गड-साक्री, तवली डोंगर गड-सुरगाणा, पातळ गड-वाल्हवे, भुयरगड-विरखेल, भिवसनगड-मावजीपाडा, मोगरागड-पाचमौली, शेवगागड-पचाळे, नारळ गड-पांगण, कोल्याटागड-बर्डीपाडा, आजीपाळगड-वडपाडा, चिचल्यागड-बंधारपाडा, धार्‍याबार्‍या गड-बासर, मांडवगड-नवापाडा, पावा गड-मानूर पेठ, धवळ्या गड-मांगी तुंगी, धवळबारी-गड शिर्वे, बगळ्या गड-जामखेल, झळका गड-झळके, असलपेढा-टेंभा बागुलपाडा, निवळा-करझंटी, भुयर गड-विरखेल, धनाई पुनाई-झिरणीपाडा, कुवर्ली गड-शिरपूर, बगला गड-ढेकवद, खारकी गड-विरखेल, खारकी गड-विरखेल.

पूर्वजांपासून चालत आलेली डोंगर्‍यादेवांची परंपरा आम्ही आनंदाने जोपासत आहोत. हे व्रत केल्याने याचे फळ फक्त व्रत करणार्‍यांनाच नाही तर संपूर्ण गावाला मिळते. : बाळू नाईक (डोंगर्‍यादेव, माऊली)

डोंगर्‍यादेव उत्सव हा कुठल्याही देवाची पूजा करण्याचा उत्सव नसून निसर्गाला देव मानून त्याची यात पूजा केली जाते. निसर्ग हाच आदिवासींचा देव आहे, निसर्ग कोपला तर कोणताही देव आपले रक्षण करू शकत नाही. या व्रतांमुळेच निसर्ग देवतेची आपल्यावर कृपा असते. : शांताराम सोनवणे (डोंगर्‍यादेव, माऊली)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -