प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या उपस्थितीत रंगणार काव्योत्सव

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनपूर्व कार्यक्रमांची मेजवाणी

Ashok Naigaonkar

नाशिक – शहरात होणार्‍या मराठी साहित्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी आयोजकांनी रसिकांसाठी कालिदास कलामंदिर येथे तीन कार्यक्रमांची मेजवाणी आयोजित केली आहे. २७ नोव्हेंबर रोजी विज्ञान साहित्यावर परिसंवाद, २८ नोव्हेंबर रोजी कविता, गाण्यांचा कार्यक्रम व ३० नोव्हेंबर रोजी संमेलनपूर्व काव्योत्सव प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच विज्ञान साहित्यिक आणि खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट, सीओईपी माजी विद्यार्थी संघटना आणि ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन समिती यांच्या संयुक्त वतीने शनिवारी (दि.२७) सायंकाळी ६ वाजता ‘मराठीतील विज्ञान साहित्य: परंपरा, सामाजिक संदर्भ आणि महत्व’ या विषयावर होणार आहे. यामध्ये नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे आणि पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. संजय ढोले हे वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. हे तिन्ही वक्ते ज्येष्ठ विज्ञान लेखक आहेत.

या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीश पिंपळे हे करणार आहेत. रविवारी (दि. २८) सांयकाळी ६ वाजता कवयित्री शांताबाई शेळके जन्मशताब्दी आणि वसंत बापट जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कवितांचा व सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. तर मंगळवारी (दि.३०) सांयकाळी ६ वाजता संमेलनपूर्व काव्योत्सव प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमधील प्रसिद्ध कवींच्या सहभागात होणार आहे.