घरमहाराष्ट्रअब की बार शेतकरी सरकार...; कृषी, पाणी समस्यांवरून केसीआर यांची महाराष्ट्रात पेरणी

अब की बार शेतकरी सरकार…; कृषी, पाणी समस्यांवरून केसीआर यांची महाराष्ट्रात पेरणी

Subscribe

नांदेड – भारतीय राष्ट्रीय समितीचे सर्वेसर्वा के.चंद्रशेखर राव आज महाराष्ट्रात नांदेड दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्रात मतपेरणी करायला त्यांनी सुरुवात केली असून अबकी बार शेतकरी सरकार असा नाराच त्यांनी आज दिला. अबकी बार मोदी सरकारच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकऱ्यांना आपल्याकडे वळवून घेण्याकरता शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं. तसंच, पाणी, भूमी, कोळसा, काम करणारे १४० कोटी जनता या देशात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नांगर हातात घेऊन कायदेसुद्धा लिहिले पाहिजेत, असं केसीआर म्हणाले. तसंच, केंद्र सरकारच्या विविध योजनांवरही त्यांनी टीकास्त्र डागलं आहे.

देशात १६ कोटी शेतकरी कुटुंब आहेत. यामध्ये मजुरांचीही संख्या अधिक आहे. शेतकरी आणि मजूर यांची संख्या एकत्र केल्यास ५० टक्क्यांपेक्षा अधिक होईल. सरकार बनवण्याकरता यापेक्षा जास्त ताकद नको, असं म्हणत केसीआर यांनी महाराष्ट्रात मतपेरणीला सुरुवात केली आहे. भारत हा बुद्धीजीविंचा देश आहे, बुद्धूंचा नाही, त्यामुळे विचार करा, असं आवाहनही त्यांनी आज केलं.

- Advertisement -

देशात आणीबाणी लागली तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या एका हाकेतून संपूर्ण देश एकवटला होता तेव्हा देशातील महान नेत्यांना फेकून देण्यात आले होते. ७५ वर्षे हा खूप मोठा कालावधी आहे. कायदा बनवण्याचं काम दुसऱ्यांच्या हाती दिले. शेतकऱ्यांनी आता फक्त नांगर उचलणे नव्हे तर कायदा बनवला पाहिजे. तुम्हीच आमदार-खासदार बना. तेव्हाच शेतकऱ्यांचं सरकार बनेल. निवडणुका येतात तेव्हा कोणता तरी पक्ष किंवा नेता जिंकतो पण जनता हारते. आता उलट झालं पाहिजे यापुढे जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा जनतेने जिंकलं पाहिजे, असं केसीआर म्हणाले.

भारत गरीब देश नाही. अनुभवासहित मी सांगतो, सत्य हे आहे की आपला देश अमेरिकेपेक्षाही धनवान आहे. नेत्यांचं काम प्रामाणिक आणि दमदार असेल तर अमेरिकेपेक्षाही प्रबल आर्थिक शक्ती बनू शकतो. भारतात संपत्ती आहे, त्या संपत्तीपासून प्रजा वंचित आहे. पाणी, भूमी, कोळसा, काम करणारे १४० कोटी जनता या देशात आहेत, असं केसीआर म्हणाले.

- Advertisement -

भारतात सर्वाधिक शेतीयोग्य जमीन

अमेरिकेकडे फक्त २९ टक्के शेतीयोग्य जमीन आहे. भारताकडे ५० टक्के शेतीयोग्य जमीन आहे. भारताकडे एकूण ८३ कोटी एकर जमीन आहे. यापैकी ७० टक्के जमीन शेतीयोग्य आहे. हे माझे नाही तर केंद्र सरकारचे आकडे आहेत, असं सांगत त्यांनी भारत हा किती सुजलाम सुफलाम शेतीप्रधान देश आहे याची माहिती दिली.

महाराष्ट्रात पाण्याची वानवा का?

भारतात १ लाख ४० हजार टीएमसी पाऊस होतो. यापैकी अर्ध्या पावसाचं बाष्पीकरण होतं. ७०-७५ हजार टीएमसी पाणी शुद्ध नद्यांतून वाहतं. कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या नद्यांतून हे पाणी वाहत असतं. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही पाण्याचा ३० टक्केच वापर करण्यात येतोय. बाकी ५० हजार टीएमसी पाणी समुद्रात जातं. तरीही आपले नेते तमाशे पाहत आहेत. प्रत्येक ठिकाणी पाण्याची वानवा आहे. महाराष्ट्रातून कृष्णा, गोदावरी, पूर्णा, प्रवरा, बैनगंगा, मंजिरा, भीमा, प्राणहिता, इंद्रावतीसह अनेक लहान-मोठ्या नद्या आहेत. तरी पाण्याची समस्या का? असा प्रश्न त्यांनी केला. देशात पाण्यापासून वंचित राहावं लागतं? याचा दोषी कोण? या देशात गेल्या ७५ वर्षांत सरकार कोणी चालवले, ७५ वर्षांत ४४ वर्षें काँग्रेसने सत्ता चालवली. १६ वर्षे भाजपाने सत्ता चालवली. मध्ये काही लोक येऊन गेले थोड्या वेळासाठी. पण ७० वर्षे काँग्रेस आणि भाजपा यांच्याकडेच सत्ता होती. त्यामुळे दोषी काँग्रेस आणि भाजपाच आहे, असं म्हणत केसीआर यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर टीकास्त्र डागलं.

जोक इन इंडिया बनला

मेक इन इंडिया, जोक इन इंडिया बनला आहे. कुठे गेला मेक इन इंडिया. मेक इन इंडिया काम करत असतं तर प्रत्येक शहरांत बाजार निर्माण झाले असते. पण आपल्या बाजाराच चायनाच्या वस्तू मिळतात. मकर संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या मांजापासून, गणपतीच्या मातीपर्यंत आणि भारतीय राष्ट्रीय ध्वजापर्यंत सर्व चीनमधून येतं, असंही केसीआर म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -