घरमहाराष्ट्रकेडीएमसी भ्रष्टाचाराचा अड्डा

केडीएमसी भ्रष्टाचाराचा अड्डा

Subscribe

आतापर्यंत 30 अधिकारी, कर्मचारी लाचखोरीच्या जाळ्यात

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिग बॉस म्हणून ओळखले जाणारे अतिरिक्त आयुक्त संजय घरत हे लाचखोरीच्या जाळयात अडकल्याने महापालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. आतापर्यंत शिपायांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सुमारे ३० अधिकारी हे एसीबीच्या जाळयात अडकलेत. त्यामुळे केडीएमसी हा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा अड्डा होत असल्यासारखी स्थिती आहे. महापालिका नेहमीच विविध घोटाळ्यांनी गाजत असतानाच पालिकेतील अधिकारी व कर्मचारी लाचखोरीच्या जाळ्यात अडकल्याची मालिकाच सुरू आहे. सात महिन्यांपूर्वीच नाले सफाईच्या कामाच्या बिलासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना पालिकेच्या ‘अ’ प्रभागातील आरोग्य निरीक्षक सदाशिव ठाकरे, शिपाई विजय गायकवाड, आणि आरोग्य निरीक्षक संजय धात्रक यांना अटक केली होती. अतिरिक्त आयुक्त संजय घरत हे लाचखोरीत अडकलेले तिसावे अधिकारी ठरलेत.

- Advertisement -

अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी लाच देण्याघेण्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी ११ लाखांची मागणी केल्याप्रकरणी महापालिकेतील तत्कालीन नगरसेवक विद्याधर भोईर यांच्यासह पालिकेतील उपअभियंता दत्तात्रय मस्तूद आणि शिपाई विकास कडू यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले होते. अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचप्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी स्वाती गरुड यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी एका सराफाकडून तीन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी केडीएमसीचे ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे आणि त्यांचा खासगी वाहनचालक चांद पाशा शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई विभागाने अटक केली होती.
मागील पाच सहा वर्षात केडीएमसीत भ्रष्टाचाराने कळस गाठला असून कधी नव्हे इतके अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. उपायुक्त सुरेश पवार यांना अडीच लाखांची लाच घेताना तर कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांना पाच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. मात्र सध्या पवार आणि जोशी दोघेही पालिकेच्या सेवेत काम करीत आहेत.

हे आहेत लाचखोर ?
उपायुक्त सुरेश पवार, कार्यकारी अभियंता सुनील जोशी, प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, गणेश बोराडे, स्वाती गरूड, उपअभियंता जयवंत म्हात्रे, भालचंद्र नेमाडे, दत्तात्रय मस्तूद, कनिष्ठ अभियंता बी. जी. काटकर, अन्न निरीक्षक मधुकर शिंदे आदी बडया अधिका-यांसह प्रताप मोरे, वसंत सांगळे, नारायण परमार (सेवानिवृत्त), तुकाराम संख्ये, वसंत खाडे, नवनीत पाटील, प्रशांत नेर, मोहंमद अन्वर खान, विकास कडू असे एकूण ३० अधिकारी लाचखोरी प्रकरणी जाळ्यात अडकले आहेत. मात्र महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -