Coronavirus : तुम्ही मला अशीच साथ देत राहा – उद्धव ठाकरे

रुग्णांची संख्या नेमकी कशामुळे वाढतेय, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

CM Uddhav Thackeray FB Live
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य महाराष्ट्र आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. रुग्णांची संख्या नेमकी कशामुळे वाढतेय, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परिस्थिती नक्की नियंत्रणात येईल. तुम्ही मला अशीच साथ देत राहा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. काल मंत्रीमंडळाची बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फरसिंगने झालेली पहिली कॅबिनेट घेतली. आम्ही अंतर पाळत आहोत. आमच्यात भौतिक अंतर असले तरी आम्ही मनाने एकत्र आहोत. आम्ही एकसंध आहोत,  असे मुख्यमंत्री म्हणाले.

पहिला रुग्ण मिळाल्यानंतर काल चार आठवडे झाले आहेत. इतरांपेक्षा ही वाढ कमी आहे. पण ही वाढ शून्यावर जाऊ शकते. जगात कोरोना हात धुवून मागे लागला आहे. मात्र, आपण कोरोनाच्या मागे हात धुवून लागलो आहोत. घरी बसा, सुरक्षित रहा. एवढंच हत्यार आपल्याकडे आहे. घरात राहून आपली जनता तणावमुक्त कशी राहील, याचा प्रयत्न वाहिन्यांनी करावा. तसेच, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आहे. त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. कारण हे आजार असलेल्या लोकांचा हाय रिस्क ग्रुप आहे. घरच्या घरी योगा किंवा व्यायाम करा. हे युद्ध जिंकल्यानंतर जागतिक आर्थिक युद्ध सुरु होईल. त्या युद्धात देखील आपल्याला जिंकायचे आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आपण आपलेच योद्धे आहोत

आपण चाचणीची संख्या वाढवली आहे. मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवली आहे. रॅपिड टेस्ट किट वापरण्याचा विचार सुरु आहे. पण या सगळ्यांना प्रमाणपत्र लागते. आरोग्य विषयक वस्तूंना एक दर्जा लागतो. ज्याक्षणी त्याला परवानगी मिळेल. तेव्हा ते आणल्याशिवाय आपण राहणार नाही. चौथा आठवडा पुर्ण केल्यानंतरही आपण फारसे पुढे गेलेलो नाहीत. तरीही आपल्याला आकडा वाढू द्यायचा नाही. अमेरिका जर आपल्याकडे मदत मागत असेल तर आपणच आपले योद्धे आहोत. घर हे आपले गड किल्ले आहेत. त्यामुळे घरीच बसा, असेही भाष्य मुख्यमंत्र्यांनी केले.

वैद्यकीय सेवा अनुभवी व्यक्तींनी पुढे यावे

कोरोनाचा धोका मोठा आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा या आव्हानाचा मोठ्या हिमतीने सामना करत आहे. मात्र, आव्हानांची तीव्रता पाहता प्रशिक्षित नर्सेस, वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनी तसेच लष्करातून निवृत्त झालेल्या आणि वैद्यकीय सेवेचा अनुभव असलेल्या जवानांनी पुढे यावे. आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे, अशी साद मुख्यमंत्र्यांनी घातली आहे.

कोरोना रुग्णांची आकडेवारी

२१ हजार क्वारंटाइन

२२०० लोक आयसोलेशन

एकूण १०१८ कोरोना बाधित

६१० लोकांमध्ये सौम्य लक्षणे

११० मध्यम लक्षणे

२६ गंभीर लक्षणे

८० बरे होऊन गेले आहेत.

६४ जणांचा मृत्यू झाला आहे.