उद्धव ठाकरे – अरविंद केजरीवाल भेट; फडणवीस म्हणाले- दोघांना एकमेकांची गरज

Devendra Fadnavis
संग्रहित छायाचित्र

 

मुंबईः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. दोघांना आता एकमेकांची गरज आहे. मोदींना हरवण्यासाठी केजरीवाल हे काहीही करु शकतात व उद्धव ठाकरे ही कोणाही सोबत जाऊ शकतात हे यावरुन स्पष्ट होते, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीने भाजपची ताकद किती आहे हे दिसंत. विरोधकांनी एकत्र येण्याची ही पहिली वेळ नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत व राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग झाला आहे. त्याने काहीही फरक पडला नाही. प्रयोग यशस्वी झाला नाही.

जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अशी संकल्पना आहे. पहिल्या जलयुक्त शिवारमध्ये जिल्हाधिकारी लिडर होते. याने अनेक गोष्टी शक्य झाल्या. दुसऱ्या टप्प्यातही जिल्हाधिकारी हेच लिडर असतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

सीएम फेलो कार्यक्रम यशस्वी झाला. यातील एक मुलगी नुकतीच आयएएस झाली. तिने सांगितलं की मला सीएम फेलोचा खूप लाभ झाला. परिणामी सीएम फेलो पुन्हा सुरु केली जाणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

कांद्याला हमीभाव मिळत नाही. भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टॉमेटो रस्त्यावर फेकले, यावर फडणवीस म्हणाले, मागणी कमी झाली की पिकाला भाव मिळत नाही. एकाच पिकावर अवलंबून न राहता इतर पिकांकडेही शेतकऱ्यांनी वळायला हवे. संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचे सरकार सदैव असणार आहे.

शेती कर्ज हे अल्पवधीसाठी असतं. त्यासाठी सिबिल स्कोर तपासण्याची आवश्यकता नाही. तरी बॅंका शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असतात. म्हणूनच मी त्रास देणाऱ्या बॅंकांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पण बॅंकांचे प्रमुख मला भेटले त्यांनी विनंती केली की अशाप्रकारे कठोर भूमिका घेऊ नका. आम्ही सर्वांना फर्मान जारी करु.  मी त्यांना सांगितलं आहे की जर बॅंकांनी त्रास दिला तर कठोर भूमिका घ्यावी लागेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.