Ketaki Chitale : केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ketaki chitale sent to judicial custody of 14 days in sharad pawar controversial statment

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक करण्यात आली आहे. आज तिची पोलीस कोठडी संपणार होती, त्यामुळे तिला आज ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं आहे मात्र पुन्हा ठाणे सत्र न्यायालयाने केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ठाणे क्राईम ब्रांचने केतकी चितळेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी न केल्याने ठाणे सत्र न्यायालयाने तिला थेट न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

केतकी चितळे हिच्याविरोधात आतापर्यंत 17 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. दरम्यान मुंबईतील गोरेगाव पोलिसांतही तिच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे केतकी चितळेचा ताबा मिळवण्यासाठी गोरेगाव पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र गोरेगाव पोलिसांच्या अर्जाला केतकीचे वकील घन:श्याम उपाध्यय यांनी विरोधा केला, मात्र न्यायालयाने केतकीचा ताबा आता गोरेगाव पोलिसांकडे दिला आहे.

केतकीविरोधात गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये 14 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 153, कलम 500, कलम 501, कलम 505, कलम 504 आणि कलम 34 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अंबाजोगाई बरोबरच कळवा पोलिस ठाण्यातही तिच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.  कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, नाशिक, पवई, पुणे, अमरावती आणि पिंपरी चिंडवड या ठिकाणी केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणानंतर अभिनेत्री केतकी चितळेविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने तिला आता राज्याचा दौरा करावा लागण्याची शक्यता आहे.