केतकी चितळेला दिलासा; विविध गुन्ह्यांत 11 जुलैपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती

actor ketaki chitale arrested over facebook post on ncp sharad pawar allegations

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला तिच्याविरोधातील उर्वरित 21 गुन्ह्यांमधूनही तुर्तास दिलासा मिळाला आहे. केतकीविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. मात्र आज न्यायालयात सरकारने तिला अटक करणार नसल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे आजच्या कोर्टाच्या निकालामुळे केतकीला दिलासा मिळाला आहे.

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळेविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. यात कळवा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने एफआयआरमध्ये जामीन मंजूर केला. केतकीला 14 मे रोजी अटक करण्यात आली. यानंतर 40 दिवसांनंतर केतकीची कारागृहातून सुटका झाली.

यानंतर तिने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली होती, या प्रलंबित याचिकेत केतकीने अटकेला आव्हान देणारी आणखी एक याचिका दाखल केली, या दोन्ही याचिकांवर आज न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

केतकीविरोधात 22 गुन्हे दाखल असून तिला एका गुन्ह्यातून जामीन मंजुर झाला आहे. परंतु तिच्याविरोधातील 21 विविध गुन्ह्यांत 11 जुलैपर्यंत ताब्यात घेतले जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. याप्रकरणातील पुढील सुनावणी आता न्यायालयाने 12 जुलैला ठेवली आहे. केतकीविरोधात राज्यभरात बदनामी करणे, धर्म आणि वंशाच्या आधारे समाजात तेढ निर्माण करणे अशा अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत.

काय होत नक्की प्रकरण

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. केतकी चितळेने ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले होते. त्यानुसार कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कळवा पोलीस ठाण्यातील हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत केतकीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल केल्याचा दावाही केतकीने आपल्या याचिकेतून केला होता. मात्र या गुन्ह्यातून केतकीला जामीन मंजुर झाला, परंतु ठाण्यापाठोपाठ केतकीविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हा दाखल आहे.


शिंदे गटाची रणनिती हिंदू पंचागानुसार