घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023शेतकरी प्रश्नांवरून सभागृहात खडाजंगी, मुख्यमंत्रीही संतापले; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

शेतकरी प्रश्नांवरून सभागृहात खडाजंगी, मुख्यमंत्रीही संतापले; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा, हरभरासह अनेक पीक उत्पादकांना हमीभाव मिळत नाहीय. त्यामुळे शेतकरी दुहेरी कोंडीत अडकला आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावरून विरोधकांनी आज सभागृहात तुफान राडा केला. नियमित कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी नियम ५७ लागू करून शेतकरी प्रश्नावर कामकाज करण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळली. यावरून सभागृहात एकच गोंधळ झाला. विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांवर संताप व्यक्त केला.

“शेतकर्‍यांच्या जीवावर हे सरकार चालेल आहे. लाखाचा पोशिंदा संपतोय…”, याबाबत सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात जाब विचारला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्यावतीने सभागृहात मांडला मात्र तो नाकारण्यात आला. त्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी अध्यक्षांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत आहेत हे काय चाललंय आहे? शेतकरी चिंतातूर, हवालदिल झाला आहे. हे सभागृह नियमाने चालते मान्य आहे, पण शेतकऱ्यांचे प्रश्नच सुटणार नसतील तर काय उपयोग आहे? निव्वळ प्रश्नोत्तरे घेऊन असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अध्यक्षांना केला.

- Advertisement -

यावरून सभागृहात गोंधळ निर्माण झालेला असतानाच नियमित कामकाज सुरू करण्यात आले. प्रश्नोत्तराचा तास सुरू असातना विरोधकांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे संतापलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसंच, विरोधकांनी उपस्थित केलेल्या शेतकरी प्रश्नावरही उत्तर दिले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “अवकाळीबाबात तातडीने पंचनामे करायच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. युद्धपातळीवर पंचनामे करून माहिती पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सभागृहाची जी भावना आहे तीच सरकारची भावना आहे. शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत अशी भूमिका जशी तुमची आहे तशी आमचीच आहे. नियमांवर बोट ठेवून पैसे अडवून ठेवलेले नाही. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त पैसे दिले. आता जे नुकसान झाले आहेत त्याचे पंचनामे होत असून माहिती मिळाल्यावर तत्काळ मदत देणार आहोत. सरकारने हात आखडता घेतलेला नाही. सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. शेतकऱ्यांमागे सरकार आणि विरोधकांनी एकत्र राहण्याची वेळ आहे. पंचनामे पूर्ण होताच तातडीने मदत देऊ,” असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

- Advertisement -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतरही विरोधकांनी शांततेची भूमिका न घेता सभागृहात घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर बोट दाखवून आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेत आहोत. तुमच्यासारखे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली नाही. ५० हजार देणार होते ते दिले का? ते ५० हजार आम्ही दिले शेतकऱ्यांना, असा संतापलेल्या सुरात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना झापलं.

परंतु, विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी किती केंद्रावर सुरू झाली आहे याची माहिती देण्याचे आवाहन अजित पवारांनी केले. प्रत्यक्षात कांदा खरेदी सुरू झालेली नाही, असा दावाही अजित पवारांनी यावेळी केला.

बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. नाशिक केंद्रामधून कांदा खरेदी सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंतची खरेदीची आकडेवारी लवकरच जाहीर करू असंही दादा भुसे म्हणाले. परंतु, यावरूनही विरोधकांनी गोंधळ घातला. सरकारच्या माहितीवर विश्वास नसल्याचं सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेचा सभात्याग करत असल्याचं जाहीर केलं.

दरम्यान, सरकारने दिलेली माहिती खोटी असेल तर हक्कभंग आणावा, गोंधळ घालू नये, असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -